अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदीच्या कराराला महिनाही पूर्ण झालेला नसतानाच, आखाती देशांमधील परिस्थिती पुन्हा एकदा अत्यंत स्फोटक बनली आहे. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘हॉर्मुजच्या सामुद्रधुनी’ परिसरात गेल्या २४ तासांत तीन तेलवाहू जहाजांवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले करण्यात आले आहेत. या ताज्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा आणि सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ड्रोन हल्ला आणि जहाजांचे नुकसान
ब्रिटनच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तिसऱ्या जहाजाला लक्ष्य करण्यात आले. एका अज्ञात ‘ड्रोन’द्वारे या जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजाचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणाची हानी झालेली नाही. हे जहाज आता आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहे.
यापूर्वी झालेल्या हल्ल्यात ओमानच्या किनारपट्टीजवळून जाणाऱ्या कतारच्या एका जहाजाला आग लागली होती. इराणच्या सागरी हद्दीतून बाहेर पडत असताना या जहाजाच्या डाव्या बाजूला अज्ञातांकडून मारा करण्यात आला होता.
कतारचा इराणवर थेट आरोप
या हल्ल्यांनंतर आखाती देशांमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेंद अल-अन्सारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
“आमच्या ‘अल रेकय्यात’ या गॅसवाहू जहाजावर झालेला हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेवरील थेट हल्ला आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे,” असे अन्सारी यांनी म्हटले आहे. यासोबतच कतारने या हल्ल्यासाठी थेट इराणला कायदेशीररीत्या जबाबदार धरले आहे.
दरम्यान, इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने, “या जहाजाने वारंवार दिलेले इशारे धुडकावून लावल्यामुळे त्यावर कारवाई झाली,” असे म्हटले आहे. मात्र, इराणने या हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारलेली नाही.
‘आमचाच मार्ग वापरा, अन्यथा…’; इराणचा इशारा
हे हल्ले अशा वेळी होत आहेत जेव्हा इराणने ‘हॉर्मुजच्या सामुद्रधुनी’तून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी स्वतःचे नियम लागू केले आहेत. “केवळ इराणने मंजूर केलेल्या मार्गावरून जाणारी जहाजेच सुरक्षित राहतील,” असा कडक इशारा इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने गेल्या गुरुवारीच दिला होता. तसेच, या भागात अमेरिकन सैन्याने हस्तक्षेप केल्यास त्याला ‘तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर’ दिले जाईल, असेही इराणने म्हटले होते.
करारानंतरही धोका कायम
गेल्या महिन्यात अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानंतर या मार्गावरून २०० हून अधिक जहाजे सुखरूप पुढे गेली होती. मात्र, गेल्या २४ तासांतील घडामोडींनंतर ब्रिटनच्या सागरी यंत्रणेने या भागातील सुरक्षेचा धोका अजूनही ‘मोठ्या प्रमाणावर’ कायम असल्याचा इशारा दिला आहे.
चर्चा रखडली; खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर तणाव वाढला
दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमधील पुढील शांतता चर्चा सध्या काही काळासाठी थांबली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेमुळे या चर्चा थांबल्याचे समजते. खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान इराणमध्ये अमेरिकेविरुद्ध तीव्र संताप पाहायला मिळाला असून, इराणमधील नागरिकांकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. यामुळे आगामी काळात हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
