Strait of Hormuz Tanker Captain Salary : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू टँकर नेण्यास तयार असलेल्या कॅप्टन आणि खलाशांना मोठ्या आर्थिक ऑफर्स दिल्या जात आहेत. फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, काही टँकर कॅप्टनना महिन्याला १ लाख डॉलर सुमारे ९७ लाख रुपये पगार आणि प्रत्येक फेरीसाठी अतिरिक्त ५० हजार डॉलर सुमारे ४८ लाख रुपये बोनस देण्याची तयारी कंपन्यांनी दाखवली आहे. इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका वाढल्याने या महत्त्वाच्या मार्गावरून जहाजे नेण्यासाठी क्रू मिळवणे कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
सामान्य खलाशांनाही ४ ते ६ पट पगार
कॅप्टनपुरताच हा वाढीव मोबदला मर्यादित नाही. साधारणपणे महिन्याला सुमारे दीड हजार डॉलरपासून पगार मिळणाऱ्या खलाशांना हॉर्मुझमधून प्रवास करण्यासाठी नेहमीच्या पगाराच्या ४ ते ६ पट मोबदला दिला जात आहे. कॅप्टनचा नेहमीचा मासिक पगार सुमारे १५ हजार डॉलर असतो. दक्षिण लाल समुद्र आणि ओमानच्या आखातात काम करणाऱ्या क्रूला दुप्पट पगार दिला जात असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
आतापर्यंत ९३ जहाजांवर हल्ले
हॉर्मुझमधील धोका किती मोठा आहे, याची कल्पना हल्ल्यांच्या आकडेवारीवरून येते. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनुसार, २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत किमान ९३ जहाजांवर हल्ले झाले असून २४ खलाशांचा मृत्यू झाला आहे. २० सप्टेंबरपासून हल्ल्यांमध्ये आणखी वाढ झाली असून, सागरी सुरक्षा कंपनी ‘व्हॅनगार्ड’नुसार या काळात किमान १४ हल्ले झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जहाजे आता रात्रीच्या वेळी हॉर्मुझ पार करत आहेत आणि जीपीएस सिग्नलिंग उपकरणे बंद ठेवत आहेत.
एका दिवसाचा वाहतूक खर्च १.३ दशलक्ष डॉलर
हॉर्मुझमध्ये जाण्यास तयार जहाजांची संख्या कमी झाल्याने वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. या मार्गावर मालवाहतुकीचा दर दररोज १.३ लाख डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा दर साधारण २० ते ५० हजार डॉलर प्रतिदिन होता. एका सुपरटँकरमध्ये सुमारे २० लाख बॅरल तेल वाहून नेता येते आणि त्यावर ३५ जणांपर्यंत क्रू असू शकतो.
विमा आणि इंधनाचाही खर्च वाढला
जहाजमालकांना युद्धजोखीम विम्यासाठी जहाजाच्या किमतीच्या ६ ते १० टक्क्यांपर्यंत रक्कम द्यावी लागत आहे. सुपरटँकरसाठी हा खर्च एका फेरीसाठी तब्बल २ कोटी डॉलरपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, सुपरटँकरमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
भारतीय खलाशांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’चे सरचिटणीस मनोज यादव यांच्या म्हणण्यानुसार, काही जहाजमालक मोठ्या आर्थिक ऑफर्स देत आहेत, तर काही जण प्रवास नाकारल्यास नोकरी गमावण्याची भीती दाखवत आहेत. “खलाशांचे प्रत्येक बाजूने नुकसान होत आहे. त्यांनी नकार दिला तर नोकरी जाऊ शकते; होकार दिला तर जीव जाऊ शकतो,” असे यादव यांनी म्हटले.
