वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाचा धागा अद्याप टिकून असला तरी होर्मुझ सामुद्रधुनीभोवती निर्माण झालेला तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ओमानने सामुद्रधुनीत संशयास्पद सुरुंग आढळल्याची माहिती देत व्यापारी जहाजांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्याच वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नौदल नाकेबंदी हटविली जाईल, असा दावा केला असला अमेरिकी सैन्याकडून जहाजांना अद्याप इशारा दिला जात असल्याचे इराणमधील तस्नीम वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अमेरिकेतील व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत इराणबरोबरचा विद्यमान युद्धविराम आणखी ६० दिवस वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या मुदतवाढीमुळे दोन्ही देशांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ मिळू शकतो. मात्र वाटाघाटी सुरू असतानाच दोन्ही बाजूंकडून कठोर भूमिका मांडल्या जात असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.

सिंगापूर येथे सुरू असलेल्या शांग्री-ला डायलॉग परिषदेत अमेरिकन संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरल्यास इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई करण्यास अमेरिका पूर्णपणे सक्षम असल्याचा इशारा दिला.  त्यांनी इराणला अण्वस्त्रप्राप्तीपासून रोखणे हेच अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

तिसर्‍यांदा विश्वासघात’

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रेझाई यांनी ट्रम्प यांच्यावर तिसर्‍यांदा राजनैतिक विश्वासघात केल्याचा आरोप केला. इराणवर दबाव कायम ठेवत अमेरिका वाटाघाटींची भाषा करत असल्याचा दावा त्यांनी केला. होर्मुझवरील नियंत्रण इराणचा सार्वभौम अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकी सैन्याने जहाज रोखले

नाकाबंदीचे उल्लंघन करणार्‍या आणखी एका व्यवसायिक जहाजाला ओमानच्या समुद्रात शनिवारी अमेरिकन सैन्याने रोखले. गांबिया देशाचा ध्वज असलेल्या या जहाजाने इराणी बंदरात प्रवेश न करण्याच्या सूचनांकडे डोळझाक केल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली. मात्र हे जहाज ताब्यात घेण्यात आलेले नाही, अशी माहिती अमेरिकेच्या अधिकार्‍याने दिली.