Hormuz Strait Traffic Restrictions: अमेरिका आणि इराणमध्यु युद्धविराम होऊन देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र नाही. युद्धविरामानंतरही होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक जवळजवळ ठप्प होती. दररोज १५ पेक्षा जास्त जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देणार नसल्याचे इराणच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे तर, जहाजांना सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी लष्कराची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे ज्या अटीवर युद्धविराम झाला ती होर्मुझ सामुद्रधुनी खरचं खुली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवसाला केवळ १५ जहाजांना परवानगी

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘युद्धविराम झाल्यानंतर गेल्या २४ तासांत एक तेलाचे जहाज, पाच ड्राय बल्क कॅरिअर गुरुवारी होर्मुझमधून बाहेर पडले आहेत. दोन इराणी टँकर देखील सामुद्रधुनीतून बाहेर आले’, असे रॉयटर्सने म्हटले आहे. दरम्यान, इराण केवळ १५ जहाजांनाच होर्मुझमधू बाहेर पडण्याची परवानगी देत आहे, असे वृत्त रशियाच्या टास (TASS) या वृत्तसंस्थेने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. अबू धाबी नॅशनल ऑइल कॉर्पोरेशनच्या प्रमुख सुलतान अल जाबेर यांनी ब्लूमबर्गशी बोलताना इराणने दिलेली सशर्त मंजुरी खऱ्या अर्थाने मंजुरी म्हणता येत नाही, असे मत नोंदवले आहे.

होर्मुझ खरचं खुली आहे का?

इराणचे उप परराष्ट्र मंत्री, सईद खतीबजादेह यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत माहिती दिली आहे. होर्मुझ खुली असली तरी, प्रत्येक टँकर आणि जहाजाला सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी इराणी लष्कर आणि अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी घेणे गरजेचे आहे, असे खतीबजादेह म्हणाले. “संघर्ष सुरु असल्यामुळे काही तांत्रिक मर्यादा लागू करण्यात आल्याने सध्या सामुद्रधुनीचा मार्ग अरुंद झाला आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे”, असे खतीबजादेह यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. मंत्र्याच्या या वक्तव्यामुळे सामुद्रधुनी पार करण्यासाठी परवानगी गरजेची असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानमध्ये होणार चर्चा

अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामात होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. दोन्ही देशांनी याबाबत अटी ठेवल्याचे समोर आले. इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या १० मुद्यांच्या प्रस्तावात होर्मुझवर टोल आकारण्याची मुभा आणि संपूर्ण नियंत्रणाचा उल्लेख आहे. तर, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित आणि पूर्ण खुली करण्याच्या अटीवर शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला, असे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये शांतात प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

दोन्ही देश मांडणार बाजू

पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये होणाऱ्या चर्चेत दोन्ही देशातील संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इराण होर्मुझ सामुद्रधुनीचे नियंत्रण आणि तिथं शुल्क आकारणी सुरु करण्यासाठी वाटाघाटी करण्याच्या तयारी आहे. दुसरीकडे अमेरिका होर्मुझ पूर्णपणे खुली करण्याची मागणी करत आहे. शिवाय युरेनियमचे संवर्धन थांबवणे आणि इराण अण्वस्त्र निर्माण करणार नाही याची हमी अमेरिकेला हवी आहे.