Woman gang-raped by 7 men in front of boyfriend: सात जणांनी २८ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या प्रियकरासमोरच नराधमांनी हे कृत्य केले. संशयित अत्याचार करुन थांबले नाहीत तर त्यांनी पीडित महिलेकडून दहा हजार रुपये खंडणी देखील वसूल केली. आसामच्या सिलचर भागात ही घटना घडली.
सात जणांकडून आळीपाळीने अत्याचार
महिला प्रियकरासोबत कारमध्ये बसली होती. यावेळी सात संशयित एका कारमधून त्याठिकाणी आले. संशयितांनी जोडप्याला मारहाण करुन महिलेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, फरार असलेल्या इतरांचा पोलिस शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल
पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला ही घटना घडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (५) (जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणे), ३१० (२) (दरोडा), ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी), ६१ (२) (दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेले बेकायदेशीर कृत्य, ७० (१) (सामूहिक बलात्कार), ७६ (महिलेचे कपडे उतरवण्याच्या किंवा तिला नग्न करण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने तिच्यावर गुन्हेगारी बळजबरी करणे), ७९ (महिलेच्या विनम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृती) अंतर्गत सिलचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण
बलात्काराच्या या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला एका संशयिताच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेचे वृत्त का दिले? असा प्रश्न विचारुन त्याला मारहाण करण्यात आली. स्थानिकांनी पत्रकाराला वाचवले, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी देखील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, एकाला अटक अटक करण्यात आली आहे.
