Bihar Crime News: लग्नमंडपातच १८ वर्षीय नवरीवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार बक्सर, बिहार येथे उघडकीस आला आहे. वरमाला विधी सुरु असताना माथेफिरु तरुणाने नवरीच्या पोटावर गोळी झाडली. तरुणाने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. १८ वर्षीय तरुणीवर सध्या उपचार सुरु असून, तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जाते.
नेमकं काय घडलं?
बक्सर जिल्ह्यातील मल्ला तोळा येथे मंगळवारी रात्री आरती कुमारी या तरुणीचा लग्न समारंभ सुरु होता. नवरा – नवरी बोहल्यावर असताना वरमाला घालण्याचा विधी सुरु होता. त्यावेळी एक तरुण हातात पिस्तूल घेऊन स्टेजच्या नजीक आला. तरुणाने नवरीच्या पोटावर गोळी झाडली व घटनास्थळावरुन फरार झाला.
घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
तरुणाने नवरी गोळी झाडल्याचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरुणाने तोडांवर मास्क परिधान केला होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गोळी झाडून तरुण घटनास्थळावरुन फरार झाला. जखमी आरती स्टेजवर कोसळली, तिच्या पोटातून रक्तस्त्राव होत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जखमी अवस्थेत आरतीने हल्लेखोराचे नाव सांगितले
आरतीला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना तिने हल्लेखोराचे नाव सांगितले. दिनबंधूने मला गोळी मारली, असे आरती सांगत आहे. आरती हल्लेखोराचे नाव सांगत असतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरुन समोर आला आहे.
आरतीची प्रकृती नाजूक
जखमी आरतीवर सध्या वाराणसी येथील रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. सुरुवातीला तिला बक्सर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, तिथून वाराणसीला रेफर करण्यात आले. आरतीची प्रकृती नाजूक असून, ती अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
संशयिताचा शोध सुरु
पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून, फरार संशयिताचा शोध घेतला जात आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संशयिताच्या कुटुंबीयांना या संबंधाची काही कल्पना नसल्याचे म्हटले आहे.

