एका तरुण जोडप्यासाठी व्हॅलेंटाईन डेची संध्याकाळ आणि रात्र भयंकर अनुभव देणारी ठरली. नवऱ्याने त्याच्या पत्नीसह व्हॅलेंटाइन डे साजरा केला. ज्यानतंर काही वेळाने त्याने पत्नीची गळा चिरुन हत्या केली आणि पोलिसांपुढे गुंडानी लुटल्याचा बनाव रचला. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र ही बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही.
कुठे घडली घटना आणि नेमकं काय झालं?
हरियाणातल्या भानुगढ भागात महक नावाच्या एका तरुणीच्या हत्येचं गूढ पोलिसांनी १८ तासांमध्ये उकललं. सुरुवातीला हे प्रकरण लुटीचं वाटत होतं, कारण तसं भासवण्यात आलं होतं. पण पोलिसांनी कसून तपास केला तेव्हा ही लूट नसून कट आखून केलेली हत्या आहे हे पोलिसांना समजलं. महकच्या नवऱ्यानेच हा कट रचला होता. रविवारी रात्री उशिरा साधारण ११ च्या सुमारास अंशुलने गुरुग्राम पोलिसांना फोन केला.त्याने पोलिसांना सांगितलं की मी अंशुल बोलतो आहे. माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर गुंडांनी हल्ला केला आहे आणि माझ्या पत्नीचा गळा चिरला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुरुवातीलाही हेच वाटलं की अंशुल आणि त्याची महक यांना लुटण्यात आलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर काय घडलं?
पोलिसांनी अंशुलची कसून चौकशी केली तेव्हा अखेर त्याने गुन्हा मान्य केला आणि त्यानेच महकचा गळा चिरल्याची बाब कबूल केली. पोलिसांनी सांगितल्यानुसार अंशुलला महकच्या चारित्र्यावर संशय होता. महक गुरुग्राम येथील नामांकित बँकेत काम करत होती. मात्र तिच्यावर असलेल्या संशयातून अंशुलने महकची गळा चिरुन हत्या केली.अंशुलचे जबाब वारंवार बदलत होते. तो हल्लेखोरांविषयी ठोस माहिती देऊ शकत नव्हता. अवघ्या १८ तासांत पोलिसांनी संपूर्ण कट उघड केला आणि लुटीची कथा खोटी असल्याचे स्पष्ट झालं शिवाय अंशुलनेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी महकची हत्या केल्याची कबुली दिली.
अंशुलने महकचे दागिने गाडीच्या बाहेर फेकले होते-पोलीस
महकची हत्या केल्यानंतर अंशुलने तिचे दागिने काढून ते बाहेर फेकले, जेणेकरून लुटीचा बनाव करता येईल. मदतीसाठी इतर वाहन चालकांना हात दाखवला. मात्र एका चालकाने पोलिसांना माहिती दिली आणि तपासाची दिशा बदलली. घटनेच्या दिवशी अंशुलने नेहमीचा मार्ग टाळून कच्च्या रस्त्याने गाडी नेली होती. पत्नीच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी कॉल्समुळे तिच्या चारित्र्याबाबत अंशुलला संशय आला होता. त्या संशयातूनही त्याने महकची हत्या केली अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
महकच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
महकचे वडील कृष्णा यांनी सांगितलं की माझ्या मुलीची हत्या अंशुलनेच केली आहे असा मला संशय आला होता. कारण त्याने हातमोजे घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंशुलने आधी महकचा गळा दाबला आणि त्यानंतर तिच्या मानेवरुन सुरी फिरवून तिची हत्या केली. अंशुल आणि महक या दोघांचं लग्न गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालं होतं.

