महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचं संकट ओढवलेलं असतानाच आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा पूर आला आहे. मागील महिन्यात पुराचं संकट नेपाळमध्ये आलं होतं. त्यातून सावरलेल्या नेपाळमध्ये आता पुन्हा पुराचं थैमान माजलं आहे. आता नेपाळमध्ये बुढी गंडकी नदीला पूर आला असून त्यामुळे तीन पूल वाहून गेले आहेत.
चुमनुब्री गावाजवळ दरड कोसळल्याने काय घडलं?
नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली. चुमनुब्री गावाजवळ डोंगरावरील दरड कोसळल्याने बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नदीच्या खालच्या भागात पाण्याचा प्रवाह अचानक वाढून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात तीन पूल वाहून गेले, तर अनेक घरांचे आणि सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
प्रशासनाने नेमके काय निर्देश दिले आहेत?
या पुरानंतर आणि आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे आणखी नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. नदीच्या जवळ जाणे टाळा, तसेच सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके स्थानिकांच्या मदतीने काम करत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन आसपासच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नेपाळमध्ये २०२६ च्या पावसाळ्यात पुरामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुराचा रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या महापुरात १४०३ मृतदेह आढळले तर ६ हजारहून जण बेपत्ता होते. या आपत्तीत घरे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळच्या विविध भागांत पुन्हा पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. नेपाळ रेडक्रॉस सोसायटीच्या १ ऑक्टोबरच्या परिस्थिती अहवालानुसार, या अतिवृष्टीत ३० जणांचा मृत्यू झाला, १५ जण जखमी झाले, तर तीन जण बेपत्ता होते. सलग आलेल्या या नैसर्गिक आपत्तींमुळे नेपाळमधील जनजीवन, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.
