एपी, दुबई
पश्चिम आशियातील युद्धाची तीव्रता वाढली असून येमेनस्थित हुथी बंडखोरांनीही या युद्धात उडी घेतली आहे. इराणल समर्थन करणाऱ्या हुथींनी शनिवारी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. मात्र ही क्षेपणास्त्रे इस्रायलकडून हवेतच अडवण्यात आली. त्यानंतर इस्रायलच्या संवेदनशील लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा हुथींनी केला.
पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्ध आणखी चिघळले आहे. शुक्रवारी रात्रीपासून इस्रायलमधील काही अण्विक प्रकल्पांवर इराण आणि हेजबोला यांनी हल्ले केले. त्यानंतर शनिवारी इराणला समर्थन करणाऱ्या हुथी बंडखोरही युद्धात सहभागी झाले. हुथी बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी सांगितले की, दक्षिण इस्रायलमधील संवेदनशील लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. हुथी बंडखोर सक्रिय झाल्याने तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना ते पुन्हा लक्ष्य करण्याची भीती निर्माण झाली आहे.
हुथी बंडखोर आतापर्यंत युद्धापासून दूर राहिले होते, कारण सौदी अरेबियाबरोबर अनेक वर्षांपासून त्यांचा एक अस्थिर युद्धविराम होता. सौदी अरेबियाने २०१५ मध्ये येमेनच्या निर्वासित सरकारच्या वतीने हुथी गटांविरोधात युद्ध पुकारले होते.
तांबड्या समुद्रातून पुन्हा हल्ल्यांची भीती
इराणने होर्मूझ सामुद्रधुनी बंद केल्याने जगभरात तेलसंकट निर्माण झाले आहे. त्यातच हुथी बंडखाेर युद्धात उतरल्याने तांबड्या समुद्रातील बाब अल-मंदेब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना ते लक्ष्य करतील, अशी भीती निर्माण झाली आहे. युद्धापूर्वी या मार्गातून दरवर्षी सुमारे १ ट्रिलियन डॉलरचा व्यापार होत असे. याच ठिकाणी २०२३ मध्ये व्यापारी जहाज वाहतुकीत हुथी बंडखोरांनी मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आणला होता.
एलॉन मस्क यांच्या सहभागाचा दावा फेटाळला
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात अमेरिकी उद्योगपती एलॉन मस्क सहभागी होते, असा दावा करणारे वृत्त भारताने फेटाळले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले मंगळवारी झालेले संभाषण केवळ मोदी आणि ट्रम्प या दोन नेत्यांमध्येच झाले होते. या संभाषणात अन्य कोणीही सहभागी नव्हते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संभाषणात मस्क सहभागी झाल्याचे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.
