रॉयटर्स, एडन / दुबई
इराणची होर्मुझ सामुद्रधुनीवर पकड घट्ट झाली असताना येमेनमधील हुती बंडखोर ‘बाब अल मंदेब’ या आणखी एका महत्त्वाच्या सामुद्रधुनीजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या पेरिम बेटापर्यंत शुक्रवारी पोहोचले. येमेनमधील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. हुती बंडखोरांच्या या पवित्र्यामुळे पश्चिम आशियातील युद्धात इराणचे पारडे आणखी जड झाले आहे. त्यांनी लाल समुद्राजवळील धुबाब शहरावरही ताबा मिळविल्याचे येमेनमधील सरकारी सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हुतींवर बॉम्बहल्ल्यांची सौदी अरेबियाची विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळली.
हुती बंडखोरांना ‘बाब अल मंदेब’ या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवता आले, तर अमेरिकेची आणखी कोंडी करण्यासाठी इराणच्या ते फायद्याचे ठरणार आहे. इराणचा हुती बंडखोरांना पाठिंबा आहे. होर्मुझभोवती इराण आणि अमेरिकेने जशी सागरी वाहतुकीची कोंडी केली आहे, तशी कोंडी सौदी अरेबियाची केल्याचे हुती बंडखोरांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. नव्या घडामोडींमुळे अमेरिकेसह सौदी अरेबियाची अधिक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा मार्गही सागरी वाहतुकीसाठी थांबला, तर तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर सौदी अरेबियाची तेलनिर्यात लाल समुद्रातील या मार्गावर निर्भर आहे.
गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराणने परस्परांच्या नौकांवर हल्ले केले. अमेरिकेने इराणचे तेलाचे पाच टँकर उद्ध्वस्त केले, तर इराणनेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणार्या नौकांना लक्ष्य केले. इराण व अरब देश ओमानमध्ये सोमवारी चर्चेसाठी भेटणार आहेत.
तेलाच्या वाहिनीभोवती धुराचे लोट
सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम तेलाच्या पाइपलाइनजवळ गुरुवारी धुराचे लोट येताना दिसले. होर्मुझ सामुद्रधुनीला पर्याय म्हणून सौदी अरेबियातील तेलासाठी हा महत्त्वाचा पर्याय मानला जातो. सौदी अरेबियाने मात्र, या घटनेला दुजोरा दिलेला नाही. सौदी अरेबियाने तीन दशकातील सर्वांत कमी निर्यात ऑगस्टमध्ये केली. सौदीची तेलनिर्यात प्रतिदिन ६० लाख बॅरलवरून २३ लाख बॅरलपर्यंत घसरली आहे.
