Anthropic Claude Misuse Report: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आता विध्वंसक अस्त्रे आणि क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. आघाडीची एआय संशोधन संस्था असलेल्या ‘अँथ्रॉपिक’च्या ‘क्लॉड’ या प्रणालीचा वापर करून क्षेपणास्त्रे आणि दिशादर्शक रॉकेट्ससाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे गंभीर प्रयत्न उधळण्यात आल्याचा दावा अँथ्रॉपिकने केला आहे. डिसेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत येमेन, रशिया आणि चीनमधील विविध घटकांकडून पारंपरिक शस्त्रे विकसित करणे तसेच गुप्त माहिती गोळा करण्याचे सहा मोठे कट उधळून लावल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अँथ्रॉपिकने आपल्या मॉडेल्सच्या गैरवापराबाबत एका अहवालाद्वारे ही माहिती जाहीर केली. येमेनस्थित एका ‘शस्त्र निर्मिती सेल’ने हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे नियंत्रण आणि दिशा ठरवण्यासाठी या एआयचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

चाचणी फसली अन् पुन्हा ‘क्लॉड’कडे धाव

येमेनमधील संबंधित घटकांकडे २ हजार किलोमीटरहून अधिक पल्ल्याचे बहु-टप्प्यांचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ‘R2000’ या हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल क्षेपणास्त्र प्रणालीसह तीन स्वतंत्र विकास कार्यक्रम सुरू होते. मानवी अभियंत्यांच्या ऐवजी त्यांनी ‘क्लॉड कोड’चा वापर करून उड्डाण नियंत्रण, नेव्हिगेशन आणि स्थिरतेसाठी आवश्यक कोडिंग तयार करून घेतले.

शस्त्रनिर्मिती करणाऱ्या गटाने एका दिशादर्शक रॉकेटची चाचणीही घेतली, मात्र ती फसल्याचे स्पष्ट झाले आहे. “चाचणी अयशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधितांनी ही चाचणी का फसली, याचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी पुन्हा ‘क्लॉड’कडेच धाव घेतली,” अशी माहिती अँथ्रॉपिकने दिली आहे.

या प्रकारानंतर कंपनीने संबंधित खाते तातडीने बंद केले असून धोक्याची माहिती संबंधित यंत्रणांना दिली आहे.

चीनकडून पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांची आखणी

चीनस्थित घटकांकडून क्लॉडचा वापर करून पाणबुडीविरोधी ‘अँटी-टॉर्पेडो’ युद्धप्रणालीसाठी तीन पातळ्यांवर काम केले जात असल्याचेही अहवालात नमूद आहे. यामध्ये टॉर्पेडो प्रणालीचे चिनी भाषेतील तांत्रिक तपशील तयार करणे, निविदा-प्रस्ताव मसुदा आखणे आणि अमेरिकेच्या संरक्षण कार्यक्रमांशी तुलना करून स्वतःची प्रणाली अद्ययावत करण्याचे काम क्लॉडच्या साहाय्याने केले जात होते. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रासाठी ‘टार्गेटिंग सॉफ्टवेअर’ तयार करणे आणि ऊर्जा-आधारित अस्त्रांविषयी गुप्त माहिती गोळा करण्याचे चिनी कटही उधळण्यात आले.

रशियाकडून ‘ड्रोन स्वॉर्म’चे कोडिंग

रशियास्थित घटकांनी क्लॉड कोडचा वापर करून स्वयंचलित लष्करी ‘ड्रोन स्वॉर्म’ विकसित करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हल्ल्याचे नियोजन, पाळत ठेवणे आणि मोहीम संपवून पुन्हा तळावर परतणे यांसारखे कोड्स लिहिले जात होते. तसेच नागरी व लष्करी वापराच्या दुहेरी वस्तूंच्या खरेदीसाठीही एआयचा गैरवापर केला जात असल्याचे अँथ्रॉपिकने स्पष्ट केले आहे.