Kerala’s Youngest Organ Donor : रस्ते अपघातात भीषण गंभीर झालेल्या एका १० महिन्यांच्या चिमुकलीने तिच्या मृत्यूनंतर ५ जणांना जीवनदान दिलं आहे. अलिन शेरीन अब्राहम असं या मुलीचं नाव असून ती केरळमधील सर्वांत लहान अवयवदाती ठरली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
५ फेब्रुवारी रोजी पठाणथिट्टा जिल्ह्यातील पल्लम बोर्मा जंक्शनवर एक भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने एक कार या मुलीच्या गाडीला धडकली. या अपघातात तिचे आई, आजी आणि आजोबांसहित तीही जखमी झाली.
या अपघातानंतर अपघातग्रस्त कुटुंबाला चांगनासेरी आणि तिरुवल्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर, पुढील उपचारांसाठी कोची येथे हलवण्यात आलं. मात्र, येथे या चिमुकलीला १३ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. तिच्या मेंदूचे कार्य थांबल्याने डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. तिला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पालकांवर दुःखाचा डोंगर कोसलळेला असतानाही पालकांनी अत्यंत धीरोदात्तपणे मोठा निर्णय घेतला. यानुसार, मुलीच्या पालकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
राज्यातील सर्वांत लहान दाती
या बाळाचे यकृत, दोन मूत्रपिंडे आणि कॉर्निया दान करण्यात आले. तिच्या अवयवदानामुळे सहा महिन्यांच्या बाळाला तिचं यकृत मिळालं, त्यामुळे मरणोत्तर यकृत प्रत्यारोपण करणारी ती राज्यातील सर्वांत लहान दाती ठरली आहे. तसंच, तिचे इतर अवयवाही इतर गरजू रुग्णांना देण्यात आले.
गार्ड ऑफ ऑनर दिला
अवयवदान प्रक्रियेचे समन्वय केरळ नेटवर्क फॉर ऑर्गन शेअरिंग (KNOS) द्वारे गृह विभागाच्या सहकार्याने करण्यात आले. रुग्णालयातून अवयव तिरुवनंतपुरममधील विविध वैद्यकीय केंद्रांमध्ये नेण्यात आले. रविवारी, केरळ पोलिसांनी अलिनला तिच्या असाधारण योगदानाबद्दल आदर म्हणून गार्ड ऑफ ऑनर दिला.
एएनआयशी बोलताना केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, दुःखाच्या काळात केलेले अवयवदानाचे कृत्य समाजासाठी एक शक्तिशाली उदाहरण ठरले. हे मानवतेवरील प्रेम आणि काळजीची एक सक्रिय अभिव्यक्ती आहे, जी इतर अनेकांसाठी एक आदर्श आहे. पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची लहान मुलगी अॅलन राज्यातील सर्वात तरुण अवयवदाती ठरली. राज्याने त्या लहान मुलाला गार्ड ऑफ ऑनर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता, पोलिसांनी राज्याचा सन्मान म्हणून गार्ड ऑफ ऑनर दिला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला फोन करून शोक व्यक्त केला आहे,” जॉर्ज म्हणाले.
