How India Eliminated 3 Pahalgam Terrorists: पहलगाम खोऱ्यातील नृशंस अतिरेकी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी हजारो पर्यटक बैसरन येथील हिरवळीवर पर्यटनाचा आनंद घेत असताना काही धर्मांध अतिरेक्यांनी धर्म विचारत वेचून वेचून पुरूषांची हत्या केली. २५ जणांना त्यांचा धर्म विचारत गोळ्या घातल्या. तर एका स्थानिक नागरिकाने हस्तक्षेप केल्यामुळे त्याचीही हत्या केली. हल्ल्यानंतर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. निष्पाप नागरिकांची हत्या करून हल्लेखोर काश्मीरच्या दाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पुढचे ९३ दिवस अतिरेक्यांच्या मागावर असलेल्या सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलाने हे ऑपरेशन कसे राबवले? त्याचा हा आढावा.

बैसरन खोऱ्यात हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलासमोर आव्हान होते, ते पर्यटकांना सुरक्षितपणे पहलगाममध्ये आणणं. दुपारी हल्ला झाल्यानंतर काही तासात सुरक्षा दलाचे जवान तिथे पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. या हल्ल्यात १७ जण गंभीर जखमी झाले होते. तर २६ जणांचा बळी गेला होता. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर थेट नागरिकांना लक्ष्य करणारा हा दुसरा मोठा हल्ला होता.

सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांचा शोध

हल्ल्यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर तब्बल ९३ दिवस २५० किमी परिसर लष्कराने पिंजून काढला. २८ जुलै रोजी पॅरा (एसएफ) कमांडोची घनदाट जंगलात अतिरेक्यांचा आमनासामना झाला. यावेळी उडालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. हे तिघेही पहलगाम हल्ल्याला जबाबदार असल्याचे सांगितले गेले.

२२ एप्रिलच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस अशी सुरक्षा दलाची उच्चस्तरीय बैठक झाली. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांना ठार करणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पलयान करू द्यायचे नाही, असा निर्धार या बैठकीत केला गेला. अमित शाह यांनी सांगितल्यानुसार, अतिरेक्यांना सीमा ओलांडू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.

हल्ल्याला एक महिना उलटल्यानंतर २२ मे २०२५ रोजी दाचीगाम परिसरात अतिरेकी लपून बसले असल्याची गुप्त माहिती भारतीय गुप्तचर संस्थेला (IB) मिळाली. गृहमंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अतिरेकी या परिसरात लपून बसल्याची सूचना सुरक्षा दलाला पुरविण्यात आली.

Amit Shah on Pahalgam attack
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहताना. (Photo – ANI)

अमित शाह यांनी सांगितले की, पुढचा एक महिना गुप्तचर विभाग आणि लष्कराने दाचीगाम परिसरावर पाळत ठेवली. याच परिसरातून अल्ट्रा सिग्नल्स जात असल्याचेही आयबीच्या लक्षात आले. आपले जवान आणि सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांचे सिग्नल्स पकडण्यासाठी कडाक्याच्या थंडीत आणि अतिशय उंचावर पायी चालत होते.

२२ जुलै रोजी या प्रयत्नांना यश आले. एका अतिरेक्याने पाठवलेला सिग्नल सेन्सर्समध्ये कैद झाला. यावरून याच परिसरात अतिरेकी लपल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलीस, सीआरपीएफ आणि ४ पॅराच्या कमांडोंनी परिसराला घेरून अतिरेक्यांचा खात्मा केला.

ऑपरेशन महादेवला यश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेची माहिती संसदेलाही दिली. अमित शाह म्हणाले, पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांना संपविण्यासाठी ऑपरेशन महादेव राबविण्यात आले. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या मोहिमेला यश आले. ज्यात तीन अतिरेकी ठार करण्यात आले. सुलेमान, हमजा अफगाणी (अफगाण) आणि जिब्रान अशी या अतिरेक्यांची नावे होती.

तीन अतिरेकी कोण होते?

ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेला सुलेमान हा लष्कर-ए-तैय्यबाचा अ श्रेणीचा कमांडर होता. पहलगाम आणि गगनगीर येथे झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात त्याचा थेट सहभाग होता. सुलेमान हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते.

अफगाणी आणि जिब्रान हेदेखील लष्कर-ए-तैय्यबाचे अ श्रेणीतील अतिरेकी होते. बैसरन येथे २६ जणांचा बळी घेण्यात त्यांचाही सहभाग होता.

अतिरेक्यांची ओळख कशी पटली?

पहलगाम हल्ल्यानंतर काही स्थानिकांनी तीन अतिरेक्यांना आश्रय दिला होता, अशी माहिती एनआयएच्या हवाल्याने अमित शाह यांनी लोकसभेत दिली होती. ठार केलेल्या तीनही अतिरेक्यांचे मृतदेह श्रीनगर येथे आणले गेले होते. त्यांना आश्रय दिलेल्या चार स्थानिक नागरिकांनी तीनही अतिरेक्यांची ओळख पटवली. त्यानुसार हेच पहलगाम हल्ल्याला जबाबदार असल्याचे सांगितले गेले.

अतिरेक्यांना ठार करण्याबरोबरच त्यांच्याकडील रायफलही मिळवल्या गेल्या. पहलगाम येथील हल्ल्यात सापडलेल्या काडतुसांच्या फॉरेन्सिक तपास अहवालानुसार ही काडतुसे याच रायफलची असल्याचेही समोर आले. अतिरेक्यांच्या तीनही रायफल चंदीगड येथे तपासणीसाठी आणल्या गेल्या होत्या. पहलगाम येथे सापडलेले काडतुसे आणि या रायफलमधून झाडण्यात आलेल्या गोळ्यांची काडतुसे याची एकत्रित तपासणी केली असता याच रायफल पहलगाम हल्ल्यासाठी वापरल्याचे सिद्ध झाले.

भारतीय लष्कराचा संदेश

पहलगाम हल्ल्याची वर्षपूर्ती होत असताना भारतीय लष्कराने एक्सवर एक पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेश दिला. ऑपरेशन महादेव हे फक्त त्यावेळेसाठी होते. मात्र ऑपरेशन सिंदूर कायम चालू राहिल, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.