पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरीच टीकाही झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनात ७ मुद्यांचा समावेश
१. शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
२. वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा
३. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा
४. स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा
५. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा
६. स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा
७. वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर अभय टिळक यांचं भाष्य
अशी सात प्रकारची आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहेत. याबाबत ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ अभय टिळक यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. किमान पहिल्यांदा पोपट आजारी आहे हे मान्य केलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी गंभीर घडतं आहे किंवा घडेल अशी शक्यता आहे हे सरकारने मान्य केलंय. इतके दिवस अनेक गोष्टी करुन सरकारने त्याची सघनता थोपवण्याचा प्रयत्न केला असं मत अभय टिळक यांनी मांडलं आहे. थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत विनायक पाचलग यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी अभय टिळक यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले अभय टिळक?
“२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. चार राज्यांमधल्या निवडणुका होत्या, त्यानंतर सरकारने आवाहन केलं वगैरे सगळं आता लोकांना कळलं आहे. पण आता चटके बसू लागतील याची तयारी सगळ्यांनी करावी हे सरकारने सांगितलं आहे. या सरकारच्या कार्यपद्धतीबाबत एक कायमच सांगितलं जातं की हे सरकार कुठलीही समस्या नाकारण्याच्या मनस्थितीत असतं, त्यांचं म्हणणं असतं की अशी काही समस्या नाहीच, किंवा समस्या असेलच तर ती जुनी आहे, काँग्रेसच्या काळातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे की ऑल इज नॉट वेल. त्यामुळे समाजाची मानसिक तयारी करावी. मोदींचा सूर समाधानकारक आहे. पण ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यासाठी मोदींनी जो भावनिक सूर आळवला त्याची भीती वाटते. देशभक्तीसाठी तेल कमी वापरलं पाहिजे, सोनं घेऊ नका असं त्यांनी सांगितलं. मला भीती ही वाटते की अशा पद्धतीचं भावनिक आवाहन केलं जातं तेव्हा त्या आवाहनाला एक पदर जो असतो तो तात्कालिक असतो.”
आयुष्याकडे बघण्याची शिस्त अंगिकारावी लागणार आहे-अभय टिळक
आज आम्ही पेच प्रसंगातून जात आहोत म्हणून जरा सांभाळा, मदत करा, दृष्टी बदला. जे बदल करावे लागणार आहेत ते संरचनात्मक स्वरुपाचे आहेत. हे बदल तातडीने होणार नाहीत. किंबहुना इतकी वर्षे आपण ज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्याकडे ती पर्यायी क्षमता विकसित झालेली नाही हे ठोसपणे सांगायला हवं होतं असं मत अभय टिळक यांनी मांडलं आहे.देशभक्तीच्या आवाहनापेक्षा जबाबदार नागरिक, जबाबदार समाज यांना ज्या डोळसपणे सामोरं जायला पाहिजे तसं जायला पाहिजे होतं. होर्मुझची समुद्रधुनी रिकामी होईल, वातावरण निवळेल, मग आम्ही पूर्वीची जीवनशैली जगायला मोकळे, हा जो सूर आहे तो असमाधानकरक वाटतो. परदेशी प्रवास कमी करा, सोनं खरेदी करु नका हे तात्कालिक आहे. पण सार्वजनिक वाहतुकीकडे वळलं पाहिजे, पाम तेलाचा वापर कमी करावा या गोष्टी या सहजासहजी होणाऱ्या नाहीत. आगामी कालखंडात या प्रश्नांच्या बाबतीत आयुष्याकडे बघण्याची नवी शिस्त अंगिकारावी लागणार आहे. ती आवश्यक आहे असंही अभय टिळक यांनी म्हटलं आहे.इथून पुढच्या काळात भारताला उर्जा सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सतर्क रहावं लागणार आहे. या अनुषंगाने आपल्याला जीवनशैली बदलावी लागणार आहे. त्यासाठी जे धोरणात्मक पाठबळ हवं ते मिळालं पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही असंही मत अभय टिळक यांनी म्हटलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा पोपट आजारी आहे, त्याची लक्षणं काय?
भारतीय अर्थव्यवस्थेचा पोपट आजारी आहे त्याची लक्षणं काय? असं विचारलं असता अभय टिळक म्हणाले, अजून तरी वरकरणी लक्षणं दिसत नाहीत. अजूनही सात टक्क्यांनी प्रगती होईल वगैरे सांगितलं जातं आहे. आज मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे उर्जा सुरक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे आवाहन आहे की उर्जा सुरक्षेची बाजू भक्कम हवी. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले. इतके दिवस ती दरवाढ ग्राहकांपर्यंत येऊ नये याची काळजी घेतली. पण तो भाग तेल शुद्धिकरण कंपन्यांकडे आहे. परकिय चलन हे देखील जुनं दुखणं आहे. यावरची उत्तरंही चटकन सापडणारी नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन हे परकिय चलनाच्या गंगाजळीसाठी आहे. अजूनही परकिय चलनाची गंगाजळी आहे, पण तिच्यात भर पडण्याचे मार्ग आहेत ते आज तरी आकुंचित पावले आहेत. आर्थिक राष्ट्रवादाचा स्वर सगळीकडे गुंजतो आहे तेव्हापासून जो खुल्या व्यापाराचा माहोल होता तो बदलतो आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार खुलेपणाने व्हावा ही जी मानसिकता होती ती बदलली आहे. आखातातल्या पेच प्रसंगांमुळे हे समोर आलं आहे की इथून तिथे गेलेले जे नागरिक आहेत आणि जे परकिय चलन पाठवत असतात त्यातला ३८ टक्के वाटा हा आखाती देशांत गेलेल्या लोकांचा आहे. तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतून आपलं मनु्ष्यबळ आखाती देशांमध्ये गेलेलं आहे. सेवा क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्रात ते सगळे प्रामुख्याने आहेत. २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरु झालं तेव्हा तिथे स्थायिक झालेले लोक होते त्यांनी त्यांची बचत भराभर इथे पाठवली. मार्च आणि एप्रिलमध्ये आपल्याकडच्या बँकांमधला फ्लो वाढला. पण आता तो आकुंचन पावला आहे. जी शस्त्रसंधी झाली आहे ती किती भक्कम आहे हे नक्की नाही. त्यामुळे परकिय गंगाजळीचा जो स्रोत आहे त्यावर फरक पडू शकतो, त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ अटळ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. असंही अभय टिळक यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
