राहुल गांधी यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरेच बदल होत आहेत. २०१४ च्या तुलनेत आता १२ वर्षांनी विरोधी पक्ष हा रस्त्यावर दिसू लागला आहे. तसंच राहुल गांधींच्या पुण्यातल्या छात्रों गूंज कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आहे. राहुल गांधींची हवा आहे, प्रतिमा नेमकी कसली बदलते आहे? २०२९ ची निवडणूक भाजपाला जड जाणार का? या आणि अशा सगळ्याच प्रश्नांबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष व्हिडीओत सविस्तर विश्लेषण केलं आहे.

गिरीश कुबेर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

राहुल गांधींची पप्पू ही प्रतिमा बदलते आहे का? ते राष्ट्रीय नेते म्हणून उदयास येत आहेत का? हे विचारलं असतं गिरीश कुबेर म्हणाले, “मानसशास्त्रातलं अभ्यासाचं मोठं उदाहरण ठरु शकतं. भाजपाने आणि माध्यमांनी इतकं झिडकारल्यानंतर, मानहानी केल्यानंतर हा माणूस तगून राहिला. अलिकडे शिक्षिकेने शाळेत मुलांना ओरडलं तरी ती हल्ली डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांना उपचार वगैरे करावे लागतात. पण या मनाच्या ताकदीचं कौतुक करायला पाहिजे. ती ताकद आणि शहाणपणा टिकवून ठेवून त्यावर आरुढ होणं हे कौतुकास्पद आहे. राजकीय यश अपयश याचा हिशेब इतिहास करेलच. पण एका गोष्टीचा हिशेब झाला पाहिजे तो म्हणजे मनोनिग्रहाचा उत्कृष्ट नमुना राहुल गांधींनी सादर केला आहे. कारण हल्ली मनोरुग्णांची संख्या इतकी वाढत चालली आहे की छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसं निराशेत जातात. अशावेळी ज्या माणसाची देशाने टिंगल केली आहे ते सहन करुन ज्यांनी टिंगल केली आहे त्यांना आव्हान देणं हे कौतुकास्पद आहे.” असं स्पष्ट मत गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा संबंध आहेच

“राहुल गांधींनी पुण्यात कार्यक्रम करण्याआधी कोटा, उत्तराखंड, प्रयागराज या ठिकाणी केला. यानंतर महाराष्ट्रात त्यांनी तो कार्यक्रम केला. २००४ पासून सत्तेत असलेल्या सरकारविरोधात नाराजी निर्माण करण्यात महाराष्ट्राचा वाटा होता. कारण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. आत्ता सुद्धा अत्यंत स्थिर स्थावर वाटणाऱ्या सरकारच्या विरोधात नाराजी निर्माण करण्यामध्येही महाराष्ट्रातल्या तरुणाचाच हात आहे. अभिजीत दिपके हेच ते नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा संबंध आहेच. आणीबाणीच्या नंतर म्हणजेच काँग्रेस जेव्हा नामशेष होत होती तेव्हाही महाराष्ट्राने काँग्रेसला हात दिला होता. या राज्याच्या मातीत निधर्मीकरणाचा अंश शिल्लक आहे. काँग्रेसने जर चांगलं त्याला जोपासला आणि खत-पाणी घातलं, वाढवलं तर काँग्रेससाठी हे फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही” असंही मत गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

शिक्षणासारखा मुलभूत विषय केंद्रस्थानी येणं स्वागतार्ह-गिरीश कुबेर

शिक्षणासारखा मुलभूत विषय हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण जगातलं भव्य मंदिर बांधणं, सर्वात उंच पुतळा उभारणं याची गरज आहे का? या गरजा असतील पण जे मुलभूत आहे त्याची गरज आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दीड ते दोन टक्क्यांच्यावर खर्चच होत नाही. त्यामुळे शिक्षण जर चर्चेचा मुद्दा होत असेल तर हे स्वागतार्ह पाऊल आहे. धर्म हा वेगवेगळा असू शकतो. पण शिक्षण हे सगळ्यांसाठी सारखं असतं त्यामुळे त्याची चर्चा होणं चांगलंच आहे.