Youtuber Jyoti Malhotra: ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रविरामानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी देशाअंतर्गत कारवाईला सुरुवात केल्याचे दिसत आहे. मुंबई विमानतळावर शनिवारी (१७ मे) इसिसच्या दोन संशयित स्लीपर सेल्सच्या सदस्यांना अटक करण्यात आली. तसेच हरियाणामधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा लोकांना ताब्यात घेण्यात आले. यापैकीच एक आहे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा. ज्योतीला हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कृत्य तिने केल्याचे समोर येत आहे.
ज्योती मल्होत्रा ऊर्फ ज्योती रानी यूट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो हे चॅनेल चालवते. ज्याचे ३,८०,०० सबस्क्राइबर आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिचे १,३२,००० फॉलोअर्स आहेत. ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तान भेटीदरम्यान तिने ‘इंडियन गर्ल इन पाकिस्तान’, ‘इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर’, ‘इंडियन गर्ल ॲट काटस राज टेम्पल’ आणि ‘इंडियन गर्ल राईड्स लक्झरी बस इन पाकिस्तान’ असा नावाने काही व्हिडीओ तयार केले आहेत.
ज्योतीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचे वर्णन ‘नोमॅडिक लिओ गर्ल’, ‘वंडरर हरियाणवी + पंजाबी’ आणि ‘पुराने खयालों की मॉडर्न लडकी’ असे केले आहे.
पाकिस्तानला माहिती कशी पुरवली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सचा वापर करून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत होती. पाकिस्तानचे गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाज यांचाही फोन नंबर ज्योतीच्या मोबाइलमध्ये सेव्ह असल्याचे दिसून आले आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून हे मोबाइल नंबर तिने जट रंधावा या नावाने सेव्ह केले होते.
सोशल मीडियावर संताप, पहलगामची रेकी केल्याचा आरोप
ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर आता तिच्या जुन्या फोटो आणि व्हिडीओवरून काही अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकजण तिचे जुने फोटो शेअर करत आरोप करत आहेत. तिचा पहलगाम भेटीचा एक फोटो एका युजरने शेअर केला आहे. ज्योतीने पहलगामची रेकी केली होती का? असा प्रश्न या युजरने उपस्थित केला आहे.
आणखी एका युजरने, यूट्यूबरचाही हेरगिरी करण्यासाठी कसा वापर होऊ शकतो, याची ढोबळ माहिती दिली आहे. व्लॉगरच्या मदतीने लष्करी तळ, सीमाभाग, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे व्हिडीओ तयार करून त्याद्वारे माहिती गोळा केली जाऊ शकते. यातून शत्रुला भौगोलिक परिस्थितीची आणि सैन्याच्या हालचालीची माहिती मिळू शकते.
याच युजरने गुजरातमधील माणसाचे उदाहरण दिले आहे. ज्याने स्वतःला पीएमओ कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मीरमध्ये कमांडोची सुरक्षा मिळवून भ्रमंती केली होती. याचप्रकारे यूट्यूबर आणि व्लॉगर्सना संवेदनशील ठिकाणांचा व्हिडीओ करण्याची मुभा मिळते, याकडे या युजरने लक्ष वेधले आहे.
आणखी एका युजरने ज्योती मल्होत्राचा वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ज्योती वंदे भारत रेल्वे, रेल्वे स्थानकाची माहिती देताना दिसत आहे.