तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजयच्या TVK या पक्षाचा करीश्मा पाहण्यास मिळाला आहे. अभिनेता विजयच्या पक्षाने एनडीएत सहभागी होण्यास नकार दिला होता. आता विजयच्या पक्षाने तामिळनाडूत मुसंडी मारली आहे. दरम्यान अभिनेता विजयने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन्ही ठिकाणी तो किती आघाडीवर आहे जाणून घेऊ.
विजयने कुठल्या मतदारसंघातून किती आघाडीवर?
त्रिचुरापल्ली पूर्व आणि चेन्नईतील परम्बूर अशा दोन मतदारसंघातून विजयने निवडणूक लढवली. परम्बूर मतदारसंघात सध्या विजय २९९० मतांनी आघाडीवर आहे. तर त्रिचुरापल्ली पूर्व या मतदारसंघात विजय ३२९९ मतांनी आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही आकडेवारी दिली आहे.
विजय आणि त्याच्या टीव्हीके पक्षाची जोरदार मुसंडी
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजयची जोरदार मुसंडी पाहण्यास मिळते आहे. सुरुवातीला जे कल हाती येत होते त्यात DMK, AIAMK आणि TVK यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली. त्यानंतर विजच्या टीव्हीके या पक्षाने आघाडी घेतली. ६४ जागांवर घेतलेली ही आघाडी विजय आणि त्याच्या पक्षाला पुढे घेऊन गेली यात शंका नाही. एक्झिट पोल्समध्ये विजयच्या टीव्हीके पक्षाला ९८ ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ज्याच दिशेने हे कल जात आहेत हे दिसून येत आहे.
विजय बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
१९९० पासून विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा स्टार आहे. त्याचे वडील एस चंद्रशेखर यांनी रसिगन नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात इलयाथलपती हे टायटल देण्यात आलं होतं. त्याचा अर्थ होतो तरुण नेता. ज्यानंतर त्यांचं नाव थलपती विजय असंच ओळखलं जाऊ लागलं. २०१२ चा थुपक्की, २०१३ मध्ये आलेला थलाइवा, २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला कत्थी आणि मर्सल या चित्रपटांमध्ये विजय हा यंत्रणेच्या विरोधात लढणारा नायक म्हणून लोकांसमोर आला. त्यानंतर रिल लाइफमधून त्याने रिअल लाइफमध्ये राजकारणात आला. त्याच्या टीव्हीके या पक्षाने या निवडणुकीत करीश्मा करुन दाखवला.
विजयची त्रिसूत्री काय आहे?
विजयने त्याच्या कामांमधून आणि विविध प्रश्नांना पडद्यावर वाचा फोडली आहे. एआयडीएमके आणि डीएमके या दोन तगड्या पक्षांविरोधात विजयने आव्हान उभं केलं. विजयकडे कुठलाही राजकीय वारसा नाही. तो प्रशासन, भ्रष्टाचाराला विरोध करणं, युवकांशी संवाद साधणं अशी त्रिसूत्री त्याच्या राजकारणात पाळतो. त्याने स्पष्टच सांगितलं आहे की द्रविड सिद्धांत आणि मागील संघर्षाचा सन्मान असेल. त्यामुळेच त्याला विधानसभा निवडणुकीत यश मिळताना दिसतं आहे.
