Nitish Kumar Salary: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय प्राप्त केल्यानंतर जनता दल (युनायटेड) पक्षाच्या नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दहा वेळा एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत. २० नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नितीश कुमार आणि मंत्रीमंडळातील प्रमुख सहकाऱ्यांनी शपथ घेतली.

मुख्यमंत्रीपदाबरोबरच नितीश कुमार यांनी यापूर्वी आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून अनेक वेळा काम केले आहे. दोन दशकापासून ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मनीकंट्रोल संकेतस्थळाने नितीश कुमार यांच्या संपत्तीसंदर्भात एक वृत्त दिले आहे. ३१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एकूण संपत्ती सुमारे १.६४ कोटी रुपये इतकी होती.

नितीश कुमार यांची संपत्ती किती?

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्याकडे १३ गायी, १० वासरे आहेत. एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आहे. २१,०५२ रुपये इतकी रोख रक्कम आहे. तर विविध बँक खात्यांमध्ये ६०,८११ रुपये जमा आहेत. दिल्लीतील द्वारका येथे त्यांनी २००४ साली १,००० चौरस फूटाचा एक फ्लॅट विकत घेतला होता.

मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नितीश कुमार यांना या पदासाठी निश्चित वेतन मिळते. तसेच खासदार म्हणून काम केल्याबद्दल पेन्शनही मिळते. न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, नितीश कुमार महागाई भत्ता, प्रवास भत्ता मिळतो. तसेच अनेक टर्म आमदार म्हणून काम केल्याबद्दल त्याचीही पेन्शन मिळते.

नितीश कुमार यांनी १९८९ ते २००४ या काळात खासदार म्हणून काम केले. खासदार म्हणून केवळ एक दिवस काम केले तरी त्यांना ३१ हजार रुपये इतके वेतन मिळते. संसदेत त्यांनी खासदार म्हणून जितके वर्ष काम केले त्यानुसार त्यांना ६८,५०० रुपये इतकी पेन्शन मिळते, असे सीएनबीसीच्या वृत्ता म्हटले आहे.

न्यूज१८ च्या वृत्तानुसार, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नितीश कुमार यांना २.५ लाख रुपयांचे वेतन मिळेल. यामध्ये निवास, कार्यालय, सुरक्षा आणि आमदारकीशी संबंधित लाभही आहेत.

कोणत्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक आणि सर्वात कमी वेतन?

महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक चार लाखांहून अधिक रुपये दरमहा वेतन दिले जाते. दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर असून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुमारे ३ लाख ९० हजार इतके वेतन मिळते. तर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यातील मुख्यमंत्र्यांना बिहार राज्याइतकेच वेतन मिळते. तर त्रिपुरा आणि केरळ या राज्यातील मुख्यमंत्र्यांना सर्वात कमी वेतन मिळते.