सिडनी विद्यापीठाचे संशोधन
हिमालयाच्या पर्वतरांगेची निर्मिती भारत व युरेशिया यांच्या आघाताने ४.७० कोटी वर्षांपूर्वी झाली होती असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पथकातील वैज्ञानिकांना यापूर्वी हिंदी महासागरातील सूक्ष्मभूविवर्तनी खंड सापडला आहे. प्रशांत महासागरात अशा सूक्ष्मविवर्तनी थरांची संख्या सात असून हिंदी महासागरातील पहिला सूक्ष्मविवर्तनी खंड सापडला होता. उपग्रहांच्या मदतीने रडार छायाचित्रे घेतली आहेत. वैज्ञानिकांनी हे भूविवर्तनी तुकडय़ांचे जिगसॉ कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात त्यांना दोन भूविवर्तनी तुकडय़ांच्या आघाताचा काळ समजला आहे असा दावा केला जातो. ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी म्हटल्यानुसार ४.७० कोटी वर्षांपूर्वी भारतीय व युरेशियन प्लेटस एकमेकांवर आदळल्या तेव्हा हिमालयाची निर्मिती झाली.




युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या स्कूल ऑफ जिओसायन्सेसने म्हटले आहे की, कवचावरील ताणाने आधीच्या आघाताने अंटाक्र्टिक प्लेटला तडे गेले व ती आघात क्षेत्रापासून दूर गेली. तिचे ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या आकाराचे तुकडे झाले, ते मध्य हिंदी महासागरात होते. सिडनी विद्यापीठाचे प्रा. डायटमार म्युलर व कारा मॅथ्यूज तसेच स्क्रिप्स इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीचे प्रा. डेव्हीड सँडवेल यांनी असे म्हटले आहे की, प्राचीन भारतीय प्लेटसपैकी मॅमेरिक्स मायक्रोप्लेट महत्त्वाची आहे. या प्लेटचे भ्रमण सागरातील टेकडय़ा व विवरे यांच्या स्थानशास्त्रीय माहितीने शोधण्यात आले. या टेकडय़ांमुळे कवचावरचा ताण वाढला त्यामुळे हिमालयाची निर्मिती ४.७० कोटी वर्षांपूर्वी झाली असे म्हणता येते. सध्या भूविवर्तनी स्तरांच्या ज्या टकरी होत आहेत त्यामुळे भूगर्भीय ताण वाढत आहे. तो ताण हिमालयावरही येत असून त्यामुळे भूकंप होत आहेत. पण भारतीय प्लेटवर किती ताण आहे हे उत्तरेकडचा भाग प्रथम युरेशिया प्लेटवर आदळला तेव्हा समजले. नव्या संशोधनानुसार ५ कोटी वर्षांपूर्वी भारत वर्षांला १५ सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकत होता व तो वेग भूविवर्तनी स्तराच्या वेग मर्यादेनजीक होता. नंतर भारतीय प्लेट युरेशियन प्लेटवर आदळल्याने भारत व अंटाक्र्टिका यांच्यात दरी तयार झाली. अंटाक्र्टिकाचे कवच त्याने थोडे तुटले व बॉल बेअरिंगसारखे फिरू लागले, त्यामुळे नवीन टेक्टॉनिक प्लेटचा शोध लागला. उपग्रहाच्या रडार किरणांनी अवकाशातून सागरातील टेकडय़ा व दऱ्यांचे नकाशे तयार केले. सागरातील पाणी पर्वत व दऱ्यांकडे आकर्षित होत असते व त्यामुळे ती माहिती पारंपरिक सागरी भूभौतिकी माहितीशी ताडून पाहण्यात आली. आंतरखंडीय स्वरूपाच्या सर्वात मोठय़ा आघाताचा काळ वादग्रस्त आहे, असे मॅथ्यूज यांचे म्हणणे आहे. ‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.