नितीश कुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतली आहे. ‘सोशल इंजिनिअरींग’ची कला नितीश कुमार यांना चांगलीच अवगत आहे. त्यामुळे सत्ता कुठल्याही पक्षाची, आघाडीची येऊद्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी दहाव्यांदा शपथ घेतली आहे. एखाद्या व्यक्तीने इतक्या वेळा राज्याचा मुख्यमंत्री होणं हा रेकॉर्डच नितीश कुमार यांच्या नावे तयार झाला आहे असं म्हणता येईल.

२००० मध्ये काय घडलं होतं?

२००० मध्ये बिहारच्या विधानसभेसाठी मतदान झालं होतं. त्यावएळी राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे राबडी देवींचं सरकार पडलं. त्यावेळी केंद्रात एनडीए प्रणित अटल बिहारी वाजयपेयींचं सरकार होतं. नितीश कुमार त्या सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री होते. त्याच सरकारमध्ये नितीश कुमारांचे गुरु जॉर्ज फर्नांडिसही होते. बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला बहुमत मिळालं नाही तरी त्यांचे १२४ आमदार निवडून आले होते. त्यावेळी बिहार आणि झारखंड वेगळी राज्यं झाली नव्हती. त्यामुळे ३२४ आमदार असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताची संख्या १६३ होती. भाजपाला ६७ जागा मिळाल्या होत्या आणि नितीश कुमारांच्या समता पार्टीला ३४ जागा मिळाल्या होत्या. एनडीएकडे १५१ आमदारांचा पाठिंबा होता. एनडीएची केंद्रात सत्ता होती त्यामुळे त्यावेळी राज्यपाल असलेल्या विनोद चंद्र पाण्डेय यांनी एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. ३ मार्च २००० ला एनडीएच्या पाठिंब्याने नितीश कुमार यांनी पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे सरकार सात दिवसांत कोसळलं. कारण नितीश कुमारांना संख्याबळ पूर्ण करणाऱ्या आमदारांचा पाठिंबा मिळवता आला नाही. ज्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या घटनेनंतर लालू प्रसाद यादव यांनी अनेक तडजोडी करत राबडी देवी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवून दिली.

Nitish Kumar political strategy
नितीशकुमार ‘ file photo

२००५ मध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले

२००५ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार दुसऱ्यांदा विराजमान झाले. पण तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. २०१० मध्येही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांचं एनडीएने भावी पंतप्रधानाचा चेहरा म्हणून जाहीर केलं. त्यावेळी नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले. काही महिन्यांसाठी बिहारची सत्ता त्यांनी जीतन राम मांझी यांना सोपवली.

२०१४ ते २०२५ काय काय घडामोडी घडल्या?

दरम्यान २०१४ मध्ये नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी राजदशी हातमिळवणी केली. २०२१५ मध्ये बिहार निवडणुकीत विजय मिळवत पाचव्यांदा बिहारची खुर्ची राखली. राजद आणि जदयू यांचा संसार २०१७ मध्ये पुन्हा मोडला कारण नितीश कुमार एनडीएत सहभागी झाले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले. तर २०२२ मध्ये नितीश कुमार एनडीए सोडून पुन्हा एकदा राजदच्या वळचणीला गेले आणि महाआघाडीच्या पाठिंब्यावर आठवड्यांदा मुख्यमंत्री झाले. पुन्हा एकदा या महाआघाडीसह आणि राजदसह काडीमोड झाला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार एनडीएत आले. नवव्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमार यांना ‘पलटूराम’ हे नाव पडलं आहे ते त्यांच्या याच बदलत्या धोरणांमुळे. आता २०२५ मध्ये नितीश कुमार यांच्यासह एनडीएने निवडणूक लढवली आणि २०० हून अधिक जागा मिळवल्या. ज्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा म्हणजेच दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का नितीश कुमार यांनी एकदाही निवडणूक लढवलेली नाही.

नितीश कुमारांनी निवडणूक कधी लढवली आहे?

१९७७, १९८० आणि १९८५ या तीन वर्षांमध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यानंतर त्यांनी १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ या वर्षांमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. तरीही नोव्हेंबर २००५ पासून नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत. २००० मध्ये नितीश कुमार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते बिहार विधानपरिषदेचे सदस्य होते. २००५ लाही त्यांनी हाच फॉर्म्युला वापरला आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून हा पॅटर्न चर्चेत आहे. म्हणूनच १९८९ नंतर एकही निवडणूक न लढवता बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर २००५ पासून नितीश कुमार ही पाटी कायमची लागली आहे.