Rahul Gandhi PM Modi Residence Protest: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी ७, लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले. त्यांच्याबरोबर यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि अनेक खासदार, आमदार उपस्थित होते. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे सरकार, पोलीस यंत्रणेची भंबेरी उडालीच, पण काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांसाठीही हा धक्का होता.

नेमकं काय झालं?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राहुल गांधी वरिष्ठ नेते, खासदार, आमदारांना घेऊन १०, राजाजी मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी निघाले. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापासून हे घर अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, राहुल गांधी यांनी या आंदोलनाची कुणकुण काँग्रेसच्या नेत्यांनाही लागू दिली नाही. त्यामुळे सरकारबरोबरच काँग्रेसच्या २५ खासदारांसाठी हा धक्का होता. त्यांना खरगे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

काँग्रेसच्या एका खासदाराने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, खरगेंच्या निवासस्थानी जेव्हा वाढदिवसाचा सोहळा संपला तेव्हा राहुल गांधी यांच्या ताफ्यामागे राहण्याच्या सूचना आम्हाला दिल्या गेल्या. आम्ही त्या सूचनेप्रमाणेच केले आणि काही वेळेतच ७, लोक कल्याण मार्गावर पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला इथे आंदोलन करायचे असल्याचे सांगण्यात आले.

राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि केसी वेणूगोपाल यांनी या आंदोलनाची आखणी केल्याचे आता सांगितले जात आहे.

Rahul Gandhi PM Residence Protest in Delhi | Rahul Gandhi Priyanka Gandhi sit in protest outside PM house | राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन | दिल्ली पोलीस कारवाई राहुल गांधी निषेध आंदोलन
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Photo – ANI)

सोमवारी सीजेपीच्या समर्थकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर आज दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले होते. संसदेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जंतर-मंतर येथे जाऊन अभिजीत दिपकेची भेट घेतली. तर काँग्रेसने ७, लोक कल्याण मार्गावर आंदोलन केले.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारतर्फे राहुल गांधींशी आंदोलनस्थळी जाऊन संवाद साधला. राहुल गांधी यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र राहुल गांधी हे आंदोलनावर ठाम राहिले. यानंतर जितेंद्र सिंह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली.

राहुल गांधी यांनी शब्द फिरवले

जितेंद्र सिंह म्हणाले, “राहुल गांधी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी उद्या लोकसभेत ‘NEET’ संदर्भातील आंदोलनावर चर्चा करण्याची मागणी केली होती. ही मागणी सरकारशी बोलून मान्य करण्यात आली. मात्र त्यानंतरही त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले नाही. त्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवीन मागणी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद असलेल्या व्यक्तीने आपल्याच विधानावरून मागे फिरणे योग्य नाही.”