Bihar CM Nitish Kumar Assets: नितीश कुमार हे जवळपास दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जदयू आणि भाजपाच्या युतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि त्यानंतर नितीश कुमार बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले. बिहारच्या मंत्रिमंडळाने नुकतीच त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आपल्या संपत्तीची अधिकृत माहिती सार्वजनिक केली असून दोन दशक मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या संपत्तीची माहिती वाचून अनेकांना आश्चर्य वाटते.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केल्यानुसार, त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून १.६५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत संपत्तीमध्ये केवळ ६८,४५५ रुपये इतकी वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती बिहार सरकारच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षाच्या अखेरिस सर्व मंत्र्यांनी संपत्तीचा खुलासा करणे अनिवार्य आहे. त्यानुसार ही माहिती उघड करण्यात आली आहे.
नेमकी संपत्ती किती?
नितीश कुमार यांच्याकडे रोख २०,५५२ रुपयांची रोख आहे. तर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे ५७,८०० रुपये आहेत. जंगम मालमत्तेची किंमत अंदाजे १७.६६ लाख रुपये इतकी आहे. तर स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १.४८ कोटी इतकी आहे. नवी दिल्लीतील द्वारका येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत नितीश कुमार यांचा एक निवासी फ्लॅट आहे. या व्यतिरिक्त नितीश कुमार यांच्याकडे इतर मालमत्ता नाही.
२०२४ मध्ये, नितीश कुमार यांची मालमत्ता एकूण १.६४ कोटी होती. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीमध्ये अतिशय किरकोळ अशी वाढ झाली आहे. संपत्तीच्या खुलाशात त्यांच्याकडे ११.३२ लाख रुपयांची कार आहे, तसेच १० गायी आणि १३ वासरे आहेत.
इतर मंत्र्यांच्या आकडेवारीवरून असे दिसते की, इतर कॅबिनेट मंत्र्यांची मालमत्ता मुख्यमंत्र्यांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांच्याकडे १.३५ लाख रुपये रोख असल्याचे जाहीर केले आहे. तर त्यांची पत्नी कुमारी ममता यांच्याकडे ३५,००० रुपये आहेत. चौधरी यांच्याकडे ४ लाख रुपयांची रायफल आणि ४.९१ कोटी रुपयांची बिगरशेती जमीन असलेली स्थावर मालमत्ता आहे.
दुसरे उपमुख्यंमत्री विजय कुमार सिन्हा यांनी ४७.४६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्याकडे ७७.१८१ रुपयांची रिव्हॉल्व्हर आहे.
