Ukraine Pornography Legalization Drone Funding: रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाकरीता पैसे उभारण्यासाठी युक्रेनकडून आता नवी शक्कल लढवण्यात येत आहे. पॉर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता देऊन त्यातून महसूल मिळवण्याचा युक्रेनचा विचार आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनमध्ये सध्या अश्लील साहित्य बेकायदेशीर असून त्याचे उत्पादन करणे, बाळगणे किंवा वितरण करणे गुन्हा मानले जाते. त्यासाठी सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
बंदी असूनही गेल्या काही वर्षांत युक्रेनमध्ये पॉर्नोग्राफी क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. कायद्यातील संदिग्धतेचा वापर करून अनेक ठिकाणी लपून छपून पॉर्नचा व्यवसाय केला जातो. तसेच पोलीस अधिकारी आणि यंत्रणेतील लोकांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे त्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रौढ मनोरंजन क्षेत्राला कायद्याच्या कक्षेत आणून अर्थव्यवस्थेचा भाग बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच्यातून २.५ कोटी डॉलर्सचा (भारतीय चलनात २३७ कोटी रुपये) महसूल मिळवण्याचा सरकारचा विचार आहे.
युक्रेनच्या संसदेत वित्त समितीचे अध्यक्ष खासदार यारोस्लाव झेलेझनियाक यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार या पैशांतून सुमारे ३० हजार ड्रोन्स खरेदी केले जाऊ शकतात. झेलेझनियाक यांनी डब्लूएसजेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, प्रौढ मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर भरत नाहीत आणि त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल होतात. ही एक अजब परिस्थिती आहे.
या प्रस्तावाला समर्थन देणाऱ्यांच्या मते, पॉर्नोग्राफीला कायदेशीर केल्यामुळे अतिरिक्त कर महसूल मिळू शकतो आणि भ्रष्टाचारही कमी होऊ शकतो. तसेच दीर्घकाळ चाललेल्या युद्धाचा सामना करावा लागत असल्यामुळे गृह विभागावरील भार यानिमित्ताने थोडा कमी होऊ शकतो.
युक्रेनमध्ये पोर्नोग्राफीमध्ये वाढ
अलीकडच्या काळात युक्रेनमध्ये पॉर्नोग्राफीमध्ये वाढ नोंदलवलीगेली आहे. डब्लूएसजेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ओनली फॅन्सची मूळ कंपनी असलेल्या फेनिक्स इंटरनॅशनलला आढळून आले की, २०२३ साली युक्रेनमधील ७,९०० युक्रेनियन नागरिकांनी या प्लॅटफॉर्मवरून १३१ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
युद्धामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची?
सुमारे चार वर्षांपासून रशियाविरोधात युक्रेनचे युद्ध सुरू आहे. दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे युक्रेनला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच महसूल वाढीचे वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. संरक्षण, लष्करी उपकरणे आणि इतर युद्धकालीन गरजांसाठी युक्रेन अतिरिक्त महसुलाच्या शोधात आहे.
