TVK या जोसेफ विजय यांच्या पक्षाला काँग्रेसने पाठिंबा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर डीएमकेने त्यांच्यावर खंजीर खुपसल्याचीही टीका केली. मात्र त्या टीकेची पर्वा न करता हा पाठिंबा टीव्हीकेला मिळाला. ज्यामुळे विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधींनी हा निर्णय घेण्यामागे विजय आणि त्यांची १७ वर्षांपासूनचे जवळचे संबंध आहेत.

राहुल गांधी आणि जोसेफ विजय यांचे १७ वर्षांपासून चांगले संबंध

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांच्यात गेल्या १७ वर्षांपासून संबंध आहेत. राहुल गांधी राजकारणात जेव्हा राजकारणात त्यांचं नशीब आजमवत होते तेव्हा जोसेफ विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीत सुपरस्टार बनण्याच्या उंबरठ्यावर होते. अगदी त्यावेळेपासून या दोघांचे चांगले संबंध आहेत. जोसेफ विजय यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला तो २०२४ मध्ये. पण टीव्हीके या पक्षाच्या स्थापनेच्या आधीपासून काँग्रेस नेत्यांना विजय हे त्यांच्या विचारसरणीशी जवळीक असलेले नेते वाटत होते. २००९ मध्ये राहुल गांधी आणि जोसेफ विजय यांच्यात एक चर्चा झाली होती जी संभाव्य राजकीय भागिदारीबाबत होती. अर्थात त्यावेळी त्या भागिदारीला आकार आला नाही. पण २०२६ मध्ये तो आल्याचं दिसून येतं आहे. याचाच अर्थ राहुल गांधींनी एकदमच टीव्हीकेला आणि विजय यांना पाठिंबा दिलेला नाही.

२००९ मध्ये काय घडलं होतं?

काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी आणि जोसेफ विजय यांच्या भेटीची आठवण सांगितली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. ज्यानंतर काही महिन्यांनी राहुल गांधी आणि जोसेफ विजय यांची ही भेट झाली होती. तोपर्यंत विजय यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांना थलपती विजय असंही बिरुद लागलं होतं. अशाही चर्चा रंगल्या होत्या की विजय तेव्हा काँग्रेसमध्ये येऊ इच्छित होते. तर एक चर्चा अशीही रंगली होती की राहुल गांधीच त्यांना पक्षात आणू इच्छित होते. त्यावेळी झालेल्या भेटीची ही आठवणच २०२६ मध्ये म्हणजेच १७ वर्षांनी दिलेल्या पाठिंब्यात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

२००९ नंतरही जोसेफ विजय आणि राहुल गांधी संपर्कात होते

२००९ नंतरही जोसेफ विजय आणि राहुल गांधी हे एकमेकांच्या संपर्कात होते. २०२४ मध्ये विजय यांनी औपचारिकपणे राजकारणात प्रवेश करत स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि पक्ष स्थापन झाल्यानंतर राहुल गांधींनी २०२४ मध्ये त्यांचं अभिनंदनही केलं होतं. दरम्यान मागील वर्षी राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी विजय यांनीही राहुल गांधींची सदिच्छा भेट घेतली होती. करुर या ठिकाणी विजय यांच्या रॅली दरम्यान जी चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतरही राहुल गांधी आणि विजय यांच्यात संवाद झाला होता. तसंच तमिळनाडू निवडणुकांमध्ये विजय यांनी जेव्हा निवडणूक जिंकली तेव्हाही या दोघांमध्ये संवाद झाला होता.

काँग्रेस सूत्रांनी काय माहिती दिली?

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय आणि राहुल गांधी यांची भेट NSUI चे राष्ट्रीय सचिव गोपीनाथ पलनीयप्पन यांनी घडवून आणली होती. तसंच विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांचाही कल काँग्रेसकडेच होता. एस. ए. चंद्रशेखर दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला विजय यांना भेटीला घेऊन गेले होते. त्यावेळीही विजय यांच्या राजकीय महत्वकांक्षांबाबत चर्चा झाली होती. त्या काळात राहुल गांधी युवक काँग्रेसचे प्रभारी होते आणि अंतर्गत निवडणुकांद्वारे संघटनेत लोकशाही प्रक्रिया आणण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, विजय यांनी आधीच ‘विजय मक्कल इयक्कम’ ही संघटना स्थापन केली होती. वरकरणी ही संघटना सामाजिक कार्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी व्यापक स्तरावर ती विजय यांच्या चाहत्या वर्गाला राजकीय मतदारसंघात रूपांतरित करण्याचा प्रयत्न मानला जात होता.

विजय आणि टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला

विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळला. याबरोबरच टीव्हीकेने द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा मुन्नेत्र कळघम या पक्षांचे ५० वर्षांचे वर्चस्व मोडीत काढले आहे. ५१ वर्षीय विजय यांनी या दोन्ही पक्षांना निवडणुकीत मोठ्या फरकारने मागे टाकले . विजय आता एम.के. स्टॅलिन यांच्यानंतर तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने शनिवारी टीव्हीकेला दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय यांना आवश्यक असलेले बहुमत गाठता आले. काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एम) यांनी आधीच टीव्हीकेला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांचे संख्याबळ १०७ वरून ११६ वर पोहोचले. त्यानंतर व्हीसीके आणि आययूएमएल हे पक्षदेखील सोबत आल्याने ही संख्या १२० वर गेली.