शिवसेना पक्ष आणि चिन्ह यासंदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस होता. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा युक्तिवाद केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार युक्तिवाद करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा पक्ष नावाचा आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मागील दोन सुनावणींच्या दरम्यानही कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला होता. तसाच युक्तिवाद आज पुन्हा पाहण्यास मिळाला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं.
कपिल सिब्बल यांनी कोणते मुद्दे उपस्थित केले?
१) एकनाथ शिंदेंची मुख्य नेता या पदावर नियुक्ती कशी काय झाली? कुठल्या निकषांवर झाली?
२) शिवसेना पक्षाच्या १९९९ च्या घटनेमध्ये मुख्य नेता असा कुठलाही उल्लेख नाही.
३) पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख असताना एकनाथ शिंदे मुख्य नेता कसे काय?
४) निवडणूक आयोगाचं काम लवादाप्रमाणे चालतं, पक्षातील फुटीचा मुद्दा निवडणूक आयोगाने अधिकार नसताना कसा सोडवला?
५) पक्षाची घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कसा मिळाला?
६) शिवसेनेत फूट पडली असा निष्कर्ष निवडणूक आयोगाने कसा काय दिला?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच सिब्बल यांनी केले प्रश्न उपस्थित
असे प्रमुख मुद्दे उपस्थित करत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. २०२२ मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलं. तर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे पक्षचिन्ह देण्यात आलं ज्यानंतर उद्धव ठाकरे यांचा प्रचंड संताप झाला होता. याच प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे. आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
पक्षाची घटना ही असंवैधानिक आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं, यावर तुम्ही कशाच्या आधारे घटना संवैधानिक की असंवैधानिक ठरवणार? हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर बोलताना खासदार राऊत यांनी म्हटले की, मला असं वाटत नाही. या मुद्द्यावरही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. हा विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे. २०१८ मध्ये ज्या गाईडलाईन्स निवडणूक आयोगाने दिल्या होत्या, त्याच उल्लंघन आम्ही केलेले नाही. मात्र पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी त्याच उल्लंघन केलेले आहे हे आम्ही कोर्टासमोर मांडलं आहे. आपण एका ऐतिहासिक निर्णयाकडे चाललो आहे. पक्षफुटीसंदर्भात, पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जी बजबजपुरी या देशात माजलेली आहे, त्या दृष्टीने हे घटनापीठ ऐसिहासिक निर्णय देईल अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसत आहेत.
