नवी दिल्ली : देशातील १४ वर्षे आणि त्यापुढच्या वयोगटातील मुलींसाठी ‘एचपीव्ही’ म्हणजेच ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ लस देण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या लसीकरण कार्यक्रमांतर्गत गार्डासिल हे मोफत दिले जाणार आहे.

या लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखास कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणार्या ‘एचपीव्ही’ प्रकार १६ आणि १८ यासह ६ आणि ११ या प्रकारांपासून या लसीकरणाच्या माध्यमातून संरक्षण मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ही विशेष लसीकरण मोहीम आहे.

बाजारपेठेत गार्डासिल-४ ही लस उपलब्ध असून त्याची किंमत ३,९२७ रुपये आहे. हा डोस १५ वर्षांखालील मुलींना दिला जातो. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. त्याचे उत्पादन ‘एमएसडी इंडिया’ करते.

वैज्ञानिक पुराव्यानुसार १४ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मुलींना याचा एकच डोस दीर्घकाळ संरक्षण देतो. हे लसीकरण ऐच्छिक आणि मोफत आहे. त्यामुळे भविष्यात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. एचपीव्ही लसीमुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून ९३ ते १०० टक्के संरक्षण मिळते, असे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. तसे त्याचे पुरावे देखील आहेत.

जगातील ९० पेक्षा जास्त देश एक डोस देत आहेत. ही मोहीम सुरू झाल्यानंतर एचपीव्ही देणार्‍या १६० देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल.