कर्नाटकातील हुबळी शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिच्या पालकांनीच तिला झालेल्या बालकाची विक्री केल्याचा आरोप आहे. ही पीडित मुलगी आता पुन्हा गर्भवती असल्याचे समजले आहे. या प्रकरणी पीडित मुलीचे पालक, आरोपी आणि दोन खासगी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारवाड जिल्हा बाल संरक्षण युनिटने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून २०२५ मध्ये तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. यामुळे ती गर्भवती राहिली होती. मात्र तिच्या पालकांनी हा प्रकार लपवून ठेवला आणि पोलिसांकडे याची तक्रार केली नाही. मुलगी बाळंत झाल्यानंतर पालकांनी त्या बाळाची दुसऱ्या कुटुंबाला विक्री केल्याचा संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आता ही पीडित मुलगी पुन्हा गर्भवती आहे.

पोलीस काय म्हणाले?

“आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. पालकांचे म्हणणे आहे की, मुलीची प्रकृती ठीक नसल्याने ती एका नातेवाईकाकडे असून कारवारमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही त्याचाही तपास करत आहोत. या प्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट नसल्याने यासाठी सखोल तपासाची गरज आहे”, अशी माहिती हुबळीचे पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी दिली.

डॉक्टरांवरही गंभीर आरोप

या प्रकरणात दोन खासगी डॉक्टरांवरही कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर उपचार करताना ही माहिती मिळाल्यावर डॉक्टरांनी कायद्यानुसार अधिकाऱ्यांना कळवायचे असते. मात्र डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि कोणतीही माहिती न देता उपचार केल्याचा आरोप आहे.

“आम्ही तिच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानासुद्धा अधिकाऱ्यांना माहिती न दिल्याबद्दल व तिच्यावर उपचार केल्याप्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. ते बाळ विकले गेल्याचा आमचा संशय आहे, पोलीस तपासात हे समोर येईलच”, अशी माहिती धारवाड जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी प्रकाश कोडलीवाडा यांनी दिली.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेच्या संपूर्ण कालक्रमाची पडताळणी करत आहेत.