हबल अंतराळ दुर्बिणीने दोन जळालेल्या ताऱ्यांच्या जवळपास असलेले पृथ्वीसारखे ग्रह शोधून काढले आहेत. श्वेतबटू तारे हे लघुग्रहासारखे पदार्थ त्यांच्यावर येऊन आदळल्याने प्रदूषित होत आहेत. या शोधामुळे असे सूचित होते आहे की, खडकाळ ग्रहांचे समूह हे अशा ताऱ्यांच्या समूहात सापडत असतात. श्वेतबटू तारे हे एकेकाळी सूर्यासारखे तारे होते व ते हायडेस तारकासमूहात १५० प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर होते. हा तारकासमूह तुलनेने तरूण ६२.५० कोटी वर्षे जुना आहे.
खगोलवैज्ञानिकांच्या मते सर्व तारे या समूहात तयार होतात, पण आतापर्यंत या समूहात ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. आतापर्यंत जे आठशे बाह्य़ग्रह सापडले आहेत त्यातील केवळ चार या तारकासमूहातील ताऱ्यांभोवती फिरणारे आहेत.
केंब्रिज विद्यापीठाच्या जे.फरिही यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात आयुष्यकाल संपलेल्या ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यात आला. हबलच्या वर्णपंक्ती निरीक्षणात दोन श्वेतबटू ताऱ्यांच्या वातावरणात सिलिकॉनचे अस्तित्व सापडले होते. पृथ्वी व आपल्या सौरमालेतील इतर ग्रहांच्या खडकाळ पदार्थात सिलिकॉन हा प्रमुख घटक आहे.
हे सिलीकॉन श्वेतबटू ताऱ्यांवर लघुग्रह आदळल्याने आले असावेत. श्वेतबटू ताऱ्यांच्या गुरूत्वीय बलाने ते लघुग्रह त्यांच्याकडे ओढले गेले असावेत.
खडकाळ ग्रहांच्या निर्मितीतील प्रमुख घटकांचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. जेव्हा हे तारे जन्मतात तेव्हा त्यांच्याभोवती ग्रह निर्माण होतात व असे ग्रह अजूनही शाबूत राहिले असल्याची शक्यता आहे, असे फरिही यांनी सांगितले.सिलिकॉनशिवाय हायडेस ताऱ्यांच्या वातावरणात कार्बनचेही प्रमाण थोडय़ा प्रमाणात सापडले आहे. पृथ्वीच्या खडकाळ पदार्थामध्ये कार्बनचे प्रमाण कमी आहे; तसेच तेथेही घडले असावे. सिलिकॉन व कार्बन यांचे परस्पर तुलनात्मक प्रमाण बघता हे ग्रह पृथ्वीसारखेच असावेत असे मत फरिही यांनी व्यक्त केले आहे.