पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सोमवारी सियालदहला जाणाऱ्या कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक लागल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात १५ जण ठार झाले असून ६० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. जया वर्मा म्हणाल्या, प्राथमिक निष्कर्षानुसार मानवी चुका समोर आल्या आहेत. मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला. सकाळी ८.५५ वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेमंत्री अश्विनीवैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना अडीच लाख तर जे किरकोळ जखमी आहेत, त्यांना ५० हजार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया तत्पूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या अपघातानंतर सोशल मीडिया पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले होतं. या अपघातासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वेचा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झालेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच याप्रकरणी माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे, रेल्वे मंत्रीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.