Humayun Kabir booked threatening BJP: वादग्रस्त वक्तव्य करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील जनता उन्नयन पार्टीचे प्रमुख आणि आमदार हुमायूं कबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या युवा ब्रिगेडने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हुमायूं कबीर यांनी जाहीर सभेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत भाजपाने तीव्र आक्षेप घेतला.
हुमायूं कबीर यांच्याविरोधात गुन्हा
हुमायूं कबीर नाओदा आणि रेजीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत. रेजीनगर येथे नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात स्थानिक भाजपा नेत्यांवर कबीर यांनी घणाघाती टीका करताना हिंसेचा उल्लेख केला. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर भाजपा आता आमदार कबीर यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. हुमायूं कबीर यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
भाजपा नेत्यांवर टीका
व्हायरल व्हिडीओमध्ये हुमायूं कबीर यांचा रोख भाजपा नेत्या अनामिका घोष यांच्याकडे आहे. “निवडणूक परभवानंतरही स्थानिक भाजपा नेते अहंकारात आहेत,” असे कबीर म्हणत आहेत. “निवडणूक हरल्यानंतरही अनामिका घोष स्वतःला आमदार समजतात. येथे भाजपा असं वागतंय जणू आमदार त्यांचाच आहे. उगाच बढाया मारत शक्तीप्रदर्शन करत आहेत,” असे कबीर म्हणत आहेत.
वादग्रस्त वक्तव्यानंतर गुन्हा
या भाषणादरम्यान हुमायूं कबीर यांनी सुवेंदू अधिकारी यांना देखील अप्रत्यक्षपणे इशारा दिला. “तुमच्या लोकांना सांगा मुर्शिदाबादमधील वक्तव्यं जरा कमी करा. ज्या दिवशी मी मुस्लिमांना संघटित करून मैदानात उतरेन, त्या दिवशी मी इतका जोरदार पलटवार करेन की तुमच्या पक्षाचा झेंडा उचलणाराही कोणी उरणार नाही,” असे वक्तव्य कबीर यांनी केले. याच विधानांमुळे हुमायूं कबीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हुमायूं कबीर यांनीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मुर्शिदाबाद येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती आणि मशिदीची पायाभरणीही केली होती.
