सेऊल (द. कोरिया) : उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या मदतीने केलेली क्षेपणास्त्र चाचणी फसली. ‘ह्यूमू-२’ या क्षेपणास्त्राचा प्रक्षेपणतळावरच स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी यामुळे दक्षिण कोरियावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. 

उत्तर कोरियाने मंगळवारी यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी केली. जपानवरून गेलेल्या या क्षेपणास्त्रामुळे आता अमेरिकेच्या ताब्यातील गौम हे बेट उत्तर कोरियाच्या टप्प्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने गांगाँग शहराजवळ असलेल्या लष्करी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. मात्र तांत्रिक चुकीमुळे उड्डाणानंतर काही क्षणात त्याचा तळावरच स्फोट झाला. याबाबत बराच काळ लष्कर आणि सरकारने मौन बाळगल्यामुळे गोंधळात भर पडली. उत्तर कोरियाने हल्ला केल्याची भीती शहरात पसरली. सत्ताधारी पक्षाचे गांगाँगचे लोकप्रतिनिधी क्वोन सेआँग-डोंग यांनी या प्रकारावर टीका केली. ‘आमच्या करदात्यांच्या पैशातून तयार केलेली शस्त्रास्त्रे आमच्याच नागरिकांना घाबरवत आहेत. घटना घडल्यानंतर आलेली प्रतिक्रियाही निष्काळजीपणाची आहे. त्यांनी अद्याप अधिकृत पत्रकही जारी केलेले नाही,’ असे ट्वीट त्यांनी केले.

त्यानंतर बऱ्याच काळाने दक्षिण कोरियाच्या संरक्षण दलप्रमुखांनी याची माहिती जाहीर केली. दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसून कोणत्याही खासगी मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लष्कराने या अपघाताची एक चित्रफीतही जारी केली. चाचणी नेमकी कशामुळे फसली याच्या कारणांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

उत्तर कोरियाची सिद्धता

उत्तर कोरियाने गेल्या वर्षभरात २० प्रक्षेपण तळांवरून किमान ४० क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा घेऊन थेट अमेरिकेला धमकावण्याच्या उद्देशाने आपली आण्विक सिद्धता वाढवण्याचा हुकुमशहा किम जोंग उन यांचा प्रयत्न आहे.