Pakistan Hindu Temple Demolished: पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात १०० वर्षांहून अधिक जुने हिंदू मंदिर पाडण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मदरशासाठी जागा तयार करण्याकरिता मंदिर पाडण्यात आल्याचा दावा केला जात असून, या कारवाईच्या विरोधात हिंदू समुदायातील नागरिक एकवटले आहेत. या परिसरातील स्थानिक आणि अल्पसंख्याकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला जाब विचारत जवळपास सव्वाशे वर्षे जुने मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी केलीय, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
२१ ऑगस्ट रोजी मंदिर पाडल्याची माहिती
कट्टरपंथी आणि पाकिस्तानमध्ये बंदी घातलेल्या तहरीक- ए- लब्बैक पाकिस्तान या पक्षाच्या सदस्यांनी २१ ऑगस्ट रोजी हे मंदिर पाडल्याची माहिती समोर आली आहे. जवळच असणाऱ्या मदरशासाठी जागा तयार करण्याच्या उद्देशाने मंदिर पाडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, सरकारकडून मुसळधार पावसामुळे १०० ते १२५ वर्षे जुने मंदिर कोसळल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. लाहोर येथून जवळपास १३० किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असून, नरोवाल भागातील सिराज गावात १,००० चौरस मीटर परिसरात विस्तारले आहे.
पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टीकडून निषेध
अल्पसंख्याक केंद्रीत राजकारण करणाऱ्या पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मंदिराचे बेकायदेशीरपणे पाडकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पक्षाने मुख्यमंत्री मरीयम नवाज शरीफ यांच्याकडे केली आहे. तसेच, मंदिराचे बांधकाम पुन्हा करण्यात यावे अशीही मागणी केली आहे. पाकिस्तान मसिहा मिल्लत पार्टीचे अध्यक्ष अस्लम परवेज साहोत्रा यांनी याप्रकरणी पंजाबच्या अतिरिक्त गृहसचिवांची भेट घेत याप्रकरणी निवेदन दिल्याचे माहिती त्यांनी पीटीआयला दिली आहे. पाडकाम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी
मंदिराची सुरक्षा करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप देखील साहोत्रा यांनी निवेदनातून केला आहे. शिवाय घटनास्थळावरुन मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, विटा गायब करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मंदिराच्या जवळील जागा यापूर्वी एका ट्र्स्टला मदरशासाठी भाडेतत्वावर देण्यात आली होती पण, हा करार नंतर रद्द करण्यात आला. दरम्यान, या जागेवर अनेकांनी अवैध अतिक्रमण केल्याचा आरोपही साहोत्रांनी केला आहे. साहोत्रांनी मंदिर पुन्हा बांधून त्याला सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. सरकारने मात्र मंदिर मुसळधार पावसामुळे कोसळल्याचे म्हटले आहे.
