Impact of Hungary Election Results: अवघ्या जगात सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल या तीन देशांची चर्चा आहे. कारण हे तीन देश प्रत्यक्ष युद्धात गुंतले आहेत. त्यापाठोपाठ भारत, चीन, रशिया अशा इतर महत्त्वाच्या देशांचीही चर्चा होते. कारण हे देश अप्रत्यक्षपणे या युद्धाबाबत विचारमंथन किंवा दबावतंत्र वापरण्याची कुवत राखतात. पण एकीकडे जगभरात अमेरिका व इराण यांच्यातलं युद्ध आणि त्या युद्धाचे जगावरचे दुष्परिणाम यावर चर्चा चालू असताना दुसरीकडे अवघ्या जगासाठी आदर्शवत ठरावी अशी एक निवडणूक हंगेरीत पार पडली. या निवडणुकीनं अनेक अर्थांनी जगाला दिलासा दिला आहे. याचसंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टीकोन’मध्ये सविस्तर विश्लेषण केलं आहे.
जगात युद्ध, हंगेरीत क्रांती!
हंगेरीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हंगेरीचे ‘कधीही हरू शकणार नाहीत’ अशी प्रतिमा असणारे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांचा नामुष्कीजनक पराभव झाला. तसं पाहिलं तर ही निवडणूक म्हणजे इतर कोणत्याही लोकशाही पद्धतीच्या देशांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच पार पडली. मात्र, त्यातून समोर आलेल्या निकालांमुळे अवघ्या जगासाठी एक मोठा आदर्श घातला गेल्याचं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केलं आहे.
“युरोपात अत्यंत महत्त्वाची घटना घडली. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांचा पराभव. त्यांचा दारूण पराभव झाला. ते पंतप्रधानपदावर अमर आहेत असं चित्र होतं. त्यांना हरवणं अशक्य आहे, ते अजेय आहेत असं मानलं जात होतं. त्यांचा एकेकाळचा पक्षातला सहकारीच त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत होता. त्याला दोन तृतीयांश बहुमत मिळालं”, असं ते म्हणाले.
व्हिक्टर ओरबान यांचा पराभव का महत्त्वाचा ठरतो?
दरम्यान, ओरबान यांच्या या पराभवाचं भारतासाठी आणि जगभरातल्या इतर लोकशाहीप्रेमी व लोकशाही व्यवस्था असणाऱ्या राष्ट्रांसाठी काय महत्त्व आहे? हेही गिरीश कुबेर यांनी सविस्तर मांडलं आहे. “अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी ओरबान यांच्या पराभवावर भाष्य केलं आहे. पण या पराभवाचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जगाच्या राजकारणाला कडवं उजवं वळण देणाऱ्या अलिकडच्या काळातल्या प्रमुख नेत्यांमध्ये ओरबान एक होते. २०१० साली ते सत्तेवर आले. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्या यंत्रणेलाच कसं अपंग करावं? आपल्या मर्जीतल्या कंपन्यांनाच कसं मोठं करावं? न्यायव्यवस्था खिळखिळी कशी करावी? वंशद्वेष, धार्मिक द्वेष या माध्यमातून नागरिकांमध्ये मतभेद निर्माण कसे करावेत? याचं ओरबान हे उदाहरण होते. त्यामुळे त्यांचा पराभव महत्त्वाचा ठरतो”, असं ते म्हणाले.
ट्रम्प, पुतिन व नेतान्याहूंचे कडवे समर्थक
व्हिक्टर ओरबान हे डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन व बिन्यामिन नेतान्याहू यांचे कडवे समर्थक होते असं गिरीश कुबेर यांनी नमूद केलं. उदाहरणादाखल त्यांनी काही घटनाही सांगितल्या. “ओरबान यांनी ट्रम्प यांच्यासारखी वर्णवर्चस्ववादी भूमिका घेतली. त्याचवेळी पुतिनदेखील त्यांचे आदर्श होते. नेतान्याहूंच्या नरसंहारालाही त्यांचा पाठिंबा होता. जेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नेतान्याहूंना नरसंहारासाठी दोषी ठरवलं, तेव्हा ओरबान यांनी नेतान्याहूंना पाठिंबा दर्शवला, निकालाला विरोध केला आणि हंगेरी आयसीसीमधून बाहेर पडला”, असा संदर्भ त्यांनी दिला.
“जेव्हा जेव्हा युरोपीय संघानं नेतान्याहूंच्या विरोधाचा ठराव मांडला तेव्हा हंगेरीनं त्याला विरोध केला. युरोपातल्या देशांनी गाझातील नृशंस हत्याकांडासाठी इस्रायलला दोषी ठरवून आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपला नकाराधिकार वापरून ओरबान यांनी तो प्रयत्न हाणून पाडण्याचा उद्योग केला. त्यामुळे त्यांचा पराभव जगातल्या सर्व लोकशाहीवादी देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आशावादी ठरतो”, अशा शब्दांत गिरीश कुबेर यांनी ओरबान यांच्या पराभवाचं महत्त्व विशद केलं.
“भारतीयांनी या निवडणुकीची दखल घ्यावी”
दरम्यान, ओरबान यांचा पराभव व काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधाक घेतलेली भूमिका या दोन घडामोडींची तुलना गिरीश कुबेर यांनी आपल्या विवेचनात केली आहे. “एकीकडे ओरबान यांचा पराभव आणि दुसरीकडे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्याविरोधात घेतलेली भूमिका या दोन घटना लोकशाहीवाद्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. ट्रम्पही असं म्हणत होते की आपण नेमलेले न्यायाधीश माझ्याच विरोधात कशी भूमिका घेऊ शकतात? पण त्याची तमा न बाळगता न्यायाधीशांनी न्यायाचा हिसका आपल्या अध्यक्षांना दिला. त्याच पार्श्वभूमीवर हंगेरीतल्या लोकशाहीप्रेमी जनतेनं लोकशाहीविरोधात वागणाऱ्या नेत्याला जनमतातून मोठा दणका निवडणुकीतून दिला आहे. भारतीयांनी या निवडणुकीची दखल घ्यायला हवी”, असं ते म्हणाले.
