वृत्तसंस्था, बुडापेस्ट
हंगेरीमध्ये रविवारी झालेल्या पार्लमेंटच्या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान, तसेच कट्टर ट्रम्पसमर्थक आणि स्थलांतरितविरोधी व्हिक्टर ओर्बान यांच्या फिडेस पक्षाचा दारुण पराभव झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच युरोपातील अनेक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांप्रमाणे टोकाचा स्थलांतरित विरोध आणि वर्णद्वेष, तसेच वंशद्वेष हे ओर्बान यांच्या १६ वर्षांच्या सत्तेचे सूत्र होते. त्यामुळे त्यांच्या पराभवाचे जगभरातील लोकशाहीवाद्यांनी स्वागत केले.
युरोपिय समुदायाच्या उदारमतवादी धोरणांची खिल्ली उडवतानाच, ओर्बान यांनी नकाराधिकार वापरून अनेक महत्त्वाचे ठरावही युरोपियन पार्लमेंटमध्ये हाणून पाडले होते. ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या युद्धखोर धोरणांचे ओर्बान यांनी अनेकदा समर्थन केले होते. माध्यमे आणि न्यायव्यवस्था, तसेच अनेक घटनात्मक यंत्रणांवरही त्यांच्या समर्थकांची पकड होती.ओर्बान यांचे एके काळचे सहकारी आणि नंतरचे कट्टर विरोधक पीटर माग्यार यांच्या तिसा पक्षाने पार्लमेंटच्या १९९ जागांपैकी १३८ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला.
हंगेरीच्या जनतेने ओर्बान यांच्या एकाधिकारशाहीला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अति-उजव्या विचारांच्या पुरस्कार करण्याच्या धोरणांना नाकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ओर्बान यांनी आपला पराभव स्वीकारला असून माग्यार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी पार्लमेंटचे अधिवेशन बोलावण्याचे माग्यार यांनी हंगेरीच्या अध्यक्षांना आवाहन केले. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ५ मेपर्यंत पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली.
वादग्रस्त कारकीर्द
आपल्या १६ वर्षांच्या कालावधीत ओर्बान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी मैत्री राखली होती. ते इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याही जवळचे गणले जात होते. त्याचवेळी हंगेरीचे युरोपीय महासंघाबरोबरचे संबंध ताणले गेले होते. अल्पसंख्याकांचे हक्क चिरडणे, माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे, संस्थांची गळचेपी करणे आणि आपल्या पसंतीच्या श्रीमंत उद्योजकांना सरकारी खजिन्यातून मोठा निधी पुरवणे असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले. मात्र, हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले.
युरोपीय नेत्यांकडून प्रशंसा
युरोपच्या नेत्यांनी पीटर माग्यार यांच्यावर प्रशंसेचा वर्षाव केला आहे. आज युरोपचा आणि युरोपीय मूल्यांचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी व्यक्त केली. तर, आता आपण एकत्र येत आहोत, असे पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी समाजमाध्यमावर लिहिले. ओर्बान यांनी पराभव स्वीकारण्यापूर्वीच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, नाटोचे सरचिटणीस मार्क रट, जर्मनचे चान्सेलर फ्रेडरिक मर्झ, युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह आयर्लंड, स्वीडन, डेन्मार्क, रोमानिया या देशांच्या नेत्यांनीही माग्यार यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर माग्यार यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात नमूद केले आहे.
हा निकाल वेदनादायक आहे. मी विजयी पक्षाचे अभिनंदन करतो. आम्ही हंगेरीची सेवा करत राहू आणि विरोधकांपासून आमच्या मातृभूमीचे रक्षण करू. – व्हिक्टर ओर्बान, मावळते पंतप्रधान, हंगेरी
