सूरतमध्ये कौटुंबिक वादातून एका ३१ वर्षीय महिलेने स्वतःला घरातच पेटवून घेतले. यावेळी घरात असलेल्या पतीने स्वतःचे निर्दोषत्व सादर करण्यासाठी ठोस पुरावा राहिल म्हणून तिचा व्हिडीओ चित्रीत केला. मात्र हाच व्हिडीओ आता त्याचे तुरुंगात जाण्याचे कारण बनले आहे. पोलिसांनी ३१ वर्षीय रणजीत साहाला अटक केली आहे. पत्नी स्वतःला पेटवून घेत असताना तिला वाचविण्याऐवजी त्याने दुर्घटनेचे चित्रीकरण करत आत्महत्येसाठी उकसवले, असा आरोप करण्यात येत आहे.

मृत महिलेचे नाव प्रतिमा देवी असून वारंवार होणाऱ्या घरगुती भांडणाच्या त्रासाला कंटाळून तिने ४ जानेवारी रोजी स्वतःवर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रतिमा देवी गंभीर भाजल्या गेल्या. ११ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी साहाने पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला दोषी ठरवले जाऊ नये, म्हणून व्हिडीओ चित्रीत करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा डाव अयशस्वी झाला. इच्छापूर पोलिसांनी गुरुवारी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

इच्छापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एसी गोहिल यांनी पीटीआयला माहिती देताना सांगितले की, रणजीत साहावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ आणि १०८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या भावाने बहिणीच्या मृत्यूनंतर यात तिच्या पतीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी पुढे म्हटले की, तपास सुरू केल्यानंतर साहाच्या मोबाइलमध्ये पत्नीच्या आत्मदहनाची क्लिप आढळून आली. यात तो तिला वाचविण्याऐवजी व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचे निष्पन्न झाले.

मुळचे बिहारचे असलेल्या या जोडप्यामध्ये त्यांच्या मुलांवरून किरकोळ वादातून भांडण झाले. या वादादरम्यान साहा तिला रागात म्हणाला की, तू स्वतःला पेटवून घे. यानंतर संतापलेल्या पत्नीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले आणि स्वतःला पेटवले. स्वतःला निर्दोष ठरविण्यासाठी रणजीत साहाने या घटनेचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. पण पत्नीला वाचवले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२०१० साली रणजीत साहा आणि प्रतिमा देवी यांची एका कौटुंबिक कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले. २०१३ साली त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आणि ते सूरतला पळून गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी या नात्याचा स्वीकार केला. सूरतमधील इच्छापूर येथे हे जोडपे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत.

घरात डिझेल कसे आले?

दरम्यान घरात डिझेल कसे आले, असाही एक प्रश्न यावेळी निर्माण झाला होता. रणजीत साहा गॅरेजमध्ये काम करत असल्याचे कळले. फरशी साफ करण्यासाठी फिनाईलमध्ये मिसळण्यासाठी डिझेल आणले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.