हैदराबादमधील एका २१ वर्षीय युट्यूबर आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तरूणीने तिच्या डायरीमध्ये शेवटची नोंद ही ‘मला पुढे जाण्याची भीती वाटतेय’, अशी केल्याचे आढळून आले आहे.

बोनू कोमाली असे या विद्यार्थिनीचे नाव होते आणि तिचे प्रियकराबरोबरचे नातेसंबंध जवळपास वर्षभरापूर्वी तुटले होते. या नंतर ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. इतकेच नाही तर तिने कुवेतमध्ये काम करत असलेल्या आपल्या आईला देखील भावनिक संदेश पाठवले होता. या गूढ संदेशामुळे तिच्याबद्दल आईच्या मनात चिंता निर्माण झाली होती. कोमालीला अनेक फोन कॉल केले मात्र तिच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर तिच्या आईने मित्रांना जाऊन बघण्याची विनंती केली.

हैदराबादच्या मणिकोंडामधील तिच्या फ्लॅटवर पोहोचल्यावर, कोमालीच्या मित्रांना दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला आणि त्यांना त्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला.

दरम्यान घटनास्थळावरून एक डायरी आणि इतर काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. डायरीतील शेवटची नोंद २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेली असून, त्यामध्ये कोमालीने तिला ब्रेकअपमधून बाहेर पडताना होत असलेल्या त्रासाचे वर्णन केले होते.

डायरीत काय लिहिलं?

“मला पुढे जाण्याची भीती वाटते, कारण जर तो परत आला तर काय? मला माहित आहे की मला आता हे सगळं सोडून द्यायला हवं, मला माहित आहे की तो माझा नाही आणि तो माझ्याबरोबर राहण्याचा प्रयत्नदेखील करत नाहीये. पण माझ्यातील काही भाग अजूनही त्याची वाट पाहतोय, अजूनही आशा आहे, आजही एका दिवशी तो मला निवडेल अशी कल्पना करतेय. आणि म्हणूनच पुढे जाणे हे अशक्य वाटतेय, कारण जर मी नात्यातून अखेर पुढे निघून गेले आणि त्याच क्षणी त्याने वळून माझा विचार केला तर?” अशी नोंद डायरीत केलेली होती.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, कोमालीने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडशी नुकतेच संपर्क साधून त्याला फ्लॅटवर भेटायला बोलवले होते. यानंतर या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये ती दरवाजापाशी उभी असल्याचे दिसत आहे आणि तो व्यक्ती शांतपणे वळून निघून जाताना दिसत आहे. भेटीदरम्यान कोमालीने कथितरीत्या तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला पुन्हा एकत्र येण्याची विनंती केली होती. मात्र त्याने तिची विनंती नाकारली आणि तो फ्लॅट मधून निघून गेला.

या विद्यार्थिनीने सहा महिन्यांपूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होत, ज्याबद्दल तिच्या आईला नंतर समजले. नात्यात कटूता आल्यानेच तिने हा प्रयत्न केला होता.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील मूळची रहिवासी असलेली बोनू कोमाली ही हैदराबादमध्ये राहत होती आणि तिथे ती बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc) चे शिक्षण घेत होती. ती एक युट्यूबर देखील होती. तीच्या चॅनलवर ती लाईफस्टाईलशी संबंधित कंटेंट पोस्ट करायची.

पोस्ट मॉर्टेम तपासणीसाठी या तरूणीचा मृतदेह उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आगे. तपासाचा भाग म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज, तिचा मोबाईल फोन डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडियावरील हालचालींची तपासणी केली जात आहे. याबरोबरच, तिचे मित्र आणि ओळखीच्या लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.