Hyderabad doctor suicide latest update : अनेकांना पाळीव प्राण्यांचा प्रचंड लळा असतो. काहीजण तर पाळीव प्राण्यांना आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात. त्यांच्यावर प्रचंड माया करतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करतात. तसंच, ज्यांना पाळीव प्राण्यांची आवड असते त्यांना प्राणी घरात पाळण्यास नकार दिल्यावरही त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते. हैदराबादमध्ये असाच एक प्रकार घडला असून संबंधित डॉक्टर तरुणीने थेट टोकाचा निर्णय घेतला आे.
हैदराबादमध्ये पाळीव मांजरीवरून झालेल्या वादातून एका २३ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळीव मांजर पाळण्यावरून कुटुंबासोबत झालेल्या वादामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नेमकी घटना काय?
मृत तरुणीने नुकतीच आपली एमबीबीएस (MBBS) पदवी पूर्ण केली होती आणि ती पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. काही आठवड्यांपूर्वी तिने एक मांजर घरी आणली होती. मात्र, मांजरीमुळे तिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी आरोग्यविषयक कारणास्तव मांजर पाळण्यास विरोध केला होता. यावरून घरात वारंवार वाद होत असत. शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा तिची आई आणि आजी बाहेरून घरी परतल्या, तेव्हा ती मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
याच्या आधीही घडल्या आहेत घटना
हैदराबादमध्ये अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच, आपल्या पाळीव मांजरीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून एका २० वर्षीय बीएससी (B.Sc) विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. मांजरीच्या मृत्यूनंतर अवघ्या ३० मिनिटांत तिने हे पाऊल उचलले होते. तर, ११ मार्च रोजी हैदराबादच्या इसामिया बाजार परिसरात एका ३० वर्षीय महिलेने पतीसोबत मद्यपानाच्या सवयीवरून झालेल्या वादानंतर आत्महत्या केली होती.
पुण्यातील एका दुसऱ्या घटनेत, हुंड्याच्या मागणीवरून पती आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
