नियमित वर्ग, प्रशासकीय कामकाज;सुरळीत होऊ देण्यास विद्यार्थी तयार
रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून नियमित वर्ग आणि प्रशासकीय कामकाज नेहमीप्रमाणे सुरू करण्यासाठी संमती दिली आहे, असे हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू एम. पेरियास्वामी यांनी म्हटले आहे.
१७ जानेवारीला रोहितने आत्महत्या केल्यापासून विद्यापीठ आंदोलनांनी ढवळून निघाले आहे. दोन आठवडय़ांनंतर विद्यापीठाचे कामकाज सुरू करू देण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शविली आहे, मात्र हे आंदोलन चालवणाऱ्या ‘जॉइंट अ‍ॅक्षन कमिटी फॉर सोशल जस्टिस’ (जेएसी) च्या रविवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जेएसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आमच्या बैठकीत त्यांनी सोमवारपासून काही अटींवर नियमित कामकाज होऊ देण्याचे मान्य केले. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याबद्दल रोहितसह पाच जणांवर निलंबनाच्या कारवाईशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कुठल्याही निर्णयप्रक्रियेत सहभागी करू नये, तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या ज्या शिक्षकांनी प्रशासकीय कामकाजाचा त्याग केला आहे त्यांनी पुन्हा कामावर यावे अशी त्यांची इच्छा असून आम्हाला हे मान्य आहे, असे पेरियास्वामी म्हणाले.
जेएसीच्या मागणीनुसार काही कर्मचाऱ्यांकडून प्रशासकीय काम काढून घेण्यात येईल, तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या शिक्षकांनी त्यांचे प्रशासकीय कामकाज पुन्हा सुरू करावे यासाठी आपण त्यांना विनंती करू, असेही प्रभारी कुलगुरूंनी सांगितले.