Hyderabad Woman Sexually Assaulted: राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडून जवळपास १२ वर्षं उलटली आहेत. मात्र, अजूनही महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो आहे. दिल्लीतील घटनेनंतर देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या लाखो घटना समोर आल्या आहेत. हैदराबादमध्ये नुकतीच दिल्लीच्याच घटनेची आठवण ताजी करणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. चालत्या बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बसचालकासह त्याच्या मित्राने सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून २४ तासांत लैंगिक अत्याचाराची हैदराबादमधली ही दुसरी घटना ठरली आहे. पोलीस स्थानकात फोन आला आणि सूत्र फिरली! उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्थानकात सोमवारी मध्यरात्री १२च्या सुमारास आलेल्या फोननंतर सर्व सूत्र फिरली आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास केल्यानंतर सगळा प्रकार स्पष्ट झाला. तेलंगणातील निर्मलपासून प्रकाशम जिल्ह्याच्या दिशेने एका खासगी प्रवासी बसमधून पीडित महिला प्रवास करत होती. बस हैदराबादच्या जवळ पोहोचली असता मध्यरात्री १२ च्या सुमारास बसचालकानं महिलेवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेनं आरडा-ओरडा करू नये, यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला. आरोपी ड्रायव्हर व त्याच्या मित्राने महिलेवर चालत्या बसमध्येच लैंगिक अत्याचार केले. पीडितेचं प्रसंगावधान, आरोपीच्या आवळल्या मुसक्या! या सर्व घडामोडींदरम्यान पीडित महिलेनं १०० क्रमांकावर फोन करून स्वत:वर गुदरलेला प्रसंग कथन केला. पोलीस कंट्रोल रूमवरून तातडीने उस्मानिया विद्यापीठ पोलीस स्थानकात यासंदर्भात कळवण्यात आलं. सदर बस हैदराबादच्या सीमेत प्रवेश करत असल्याचीही माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच संबंधित बसचा ठावठिकाणा माहिती करण्यासाठी चेकनाके आणि गस्तीवरच्या पोलिसांना माहिती दिली. बालपणीच्या मित्रानंच केला भावासह तरुणीवर बलात्कार; हैदराबादमधील धक्कादायक प्रकार! काही वेळातच बस हैदराबादच्या तारनाका भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचं एक पथक तातडीने या भागाच्या दिशेनं निघालं. काही वेळात ही बस पोलिसांना सापडली आणि त्यातून पीडित महिलेला पोलिसांनी वाचवून रुग्णालयात उपचारांसाठी दाल केलं. याचवेळी पोलिसांनी बसचा चालक व पहिला आरोपी सिद्धय्याला अटक केली. दुसरा आरोपी कृष्णा मात्र पोलिसांनी बस अडवण्याआधीच पळून गेला होता. तो मेट्टुगुडा भागात बसमधून उतरल्याची माहिती सिद्धय्यानं पोलिसांना दिली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेवर मित्रानंच केला बलात्कार दरम्यान, हैदराबादमध्ये घडलेल्या दुसऱ्या एका घटनेमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर तिच्याच बालपणीच्या मित्रानं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नवीन नोकरी लागल्याच्या निमित्ताने या तरुणीने एका हॉटेलमध्ये तिचा बालपणीचा मित्र आणि दुसऱ्या एका मित्राला पार्टी दिली होती. पण दारूच्या नशेत असताना या दोघांनी तिला हॉटेलमधील एका खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सदर घटनेनंतर तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दोघा मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.