हैदराबादमधील एका हॉटेलच्या खोलीत २६ वर्षीय महिलेने आपल्या मैत्रिणीसोबत व्हिडिओ कॉलवर असतानाच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेणुका असे मृत महिलेचे नाव असून, ती बोळाराम येथील रहिवासी होती. ती शहरातील एका रेस्टॉरंट आणि पबमध्ये काम करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लंगर हौझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. रेणुकाचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तिला सात वर्षांचा एक मुलगा आहे. मात्र, ती पतीपासून वेगळी राहत होती.

प्रियकरासोबत हॉटेलमध्ये केला होता प्रवेश

तपासात समोर आले आहे की, रेणुका बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास फारुख नावाच्या तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये आली होती. हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. फारुख हा गोळकोंडा येथील रहिवासी असून तो विवाहित आहे आणि त्याला तीन मुले आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फारुख एका कौटुंबिक कार्यक्रमाला जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडला. त्यानंतर रात्री ११:५६ च्या सुमारास रेणुकाने खोलीत बिर्याणीची ऑर्डर दिली होती.

‘तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट आहे’

रात्री १२:२४ च्या सुमारास रेणुकाने तिची मैत्रीण सत्या हिला व्हिडिओ कॉल केला. दुसऱ्या दिवशी सत्याचा वाढदिवस होता. व्हिडिओ कॉलवर बोलत असताना रेणुकाने, “माझ्याकडे तुझ्यासाठी वाढदिवसाचे एक गिफ्ट आहे,” असे सांगितले आणि अचानक तिने कॉल सुरू असतानाच गळफास लावून आपले जीवन संपवले.

पोलिसांकडून तपास सुरू

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. लंगर हौझ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सय्यद मुनव्वर अली यांनी सांगितले की, “पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.”

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रेणुकाचा प्रियकर फारुख याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेणुकाचा मोबाईल फोन जप्त करून तपास केला जात आहे. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच आत्महत्येचे अचूक कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी मानसिक तणावाचा सामना करत असेल, तर कृपया खालील हेल्पलाईनवर संपर्क साधा:

वंद्रेवाला फाऊंडेशन: 9999666555
रोशनी (हायदराबाद): 040-66202000
आसरा (मुंबई): 022-27546669