वेणूगोपाल रेड्डी हा हैदराबाद येथील एस. आर. नगर भागात वास्तव्य करतो. त्याला बुधवारी गांधी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं कारण त्याच्या नाकाचा तुकडा पडल्याने तो जखमी झाला होता. त्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा पैशांच्या वादातून मित्राने माझ्या नाकाचा चावा घेतला असं त्याने सांगितलं.
बुधवारी वेणूगोपाल आणि रमेश हे दोघेजण मद्यपान करत होते. त्यावेळी या दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला. ज्यानंतर रमेशने वेणूगोपालच्या नाकाचा चावा घेतला. वेणूगोपालने काही दिवसांपूर्वी रमेशकडून उसने पैसे घेतले होते. मात्र काही कारणामुळे तो ते परत देऊ शकला नाही. जेव्हा रमेश आणि वेणूगोपाल मद्यपान करण्यासाठी बसले तेव्हा वेणूगोपालकडून आपल्याला पैसे येणं आहे हे रमेशला आठवलं. त्या पैशांवरुन या दोघांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचं रुपांतर भांडणात झालं आणि त्याच भांडणात रमेशने वेणूगोपालचं नाक चावलं ज्यामुळे त्याच्या नाकाचा तुकडाच पडला. एवढंच नाही तर वेणूगोपालला रमेशने मारहाणही केली. The News Minute ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या प्रकरणी रमेश विरोधात एस आर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.