सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कॉर्पोरेट जॉब करून सेटल व्हायचं अन् उरलेल्या वेळात सुखाने आयुष्य जगायचं असं स्वप्न सर्वच नोकरदार वर्गाचं असतं. पण हाच कम्फर्ट झोनसोडून आपली आवड कोणी जोपासली तर बऱ्याच अडी-अडचणीही समोर उभ्या राहतात. अॅमेझॉनमध्ये काम केलेल्या एका व्यक्तीने फिरायची आवड म्हणून जॉब सोडला अन् थेट उबर ड्रायव्हर बनला. गेल्या १० वर्षांपासून तो उबर चालकाचं काम करत असून याबाबत त्याच्या मनात अजिबात खंत नाही. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. चेतना सिंग या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हैदराबादमध्ये उबर सेवा सुरू झाली तेव्हा कुमार यांनी त्यांची अॅमेझॉनमधील नोकरी सोडली आणि पूर्णवेळ चालकाचं काम स्वीकारलं. एक दशकाहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांना या निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप नाही. कुमार यांच्यासाठी ड्रायव्हिंग करणे हे केवळ एक काम नाही, तर त्यांना मनापासून आवडणाऱ्या गोष्टी करण्याची ती एक संधी आहे. रोज नवीन लोकांना भेटणं, त्यांच्या गोष्टी ऐकणं आणि शहराचे विविध भाग एक्सप्लोर करणे त्यांना आवडतं.

मला माझं हैदराबाद एक्सप्लोर करायचंय

“मला माझं हैदराबाद एक्सप्लोर करायचं आहे. मी हैदराबादचाच असल्याने हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे”, असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी आतापर्यंत जवळपास २३,६०० ट्रिप्स पूर्ण केल्या आहेत. तरीही मी अजूनही ऑनलाईन असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी या ट्रिप्सचा आनंद घेतो.” कुमार यांचा हा दृष्टिकोन पाहून चेतना सिंग खूप प्रभावित झाली

भारतात सामाजिक बंधने आणि यशाच्या पारंपरिक व्याख्यांपेक्षा स्वतःच्या आवडीला प्राधान्य देणारी माणसे भेटणं खूप दुर्मिळ आहे, असं चेतना सिंग म्हणाली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना सिंगने लिहिलं, “ज्या देशात बहुतांश लोक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबावामुळे आपल्या आवडी बाजूला ठेवतात, तिथे स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टीची निवड करणारी व्यक्ती भेटणं खरोखरच प्रेरणादायी होतं.”

गेल्या काही वर्षांत कुमार यांनी सुमारे २३,६०० राईड्स पूर्ण केल्या असून, या भागातील उबरच्या सर्वात जास्त रेटिंग मिळालेल्या ड्रायव्हर्समध्ये त्यांचे नाव घेतले जाते. एक दशकाहून अधिक काळ ड्रायव्हिंग क्षेत्रात घालवूनही, या कामाबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच कायम आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावरील हजारो लोकांच्या मनाला स्पर्श केला असून, यावरून वर्क-लाइफ बॅलन्स (काम आणि आयुष्यातील समतोल), करिअरमधील समाधान आणि व्यावसायिक यशाच्या पारंपरिक संकल्पनांना आव्हान देण्याच्या लोकांच्या वाढत्या मानसिकतेवर चर्चा सुरू झाली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी कुमार यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.

आनंद आणि समाधान हे नेहमीच मोठ्या पदांवरून किंवा कॉर्पोरेट करिअरमधूनच मिळते असे नाही, याची आठवण त्यांची गोष्ट करून देते, असे नेटीझन्सनी म्हटले आहे. कुमार यांनी आपले अनुभव ऑनलाईन शेअर करावेत या सिंग यांच्या सूचनेशी इतरांनीही सहमती दर्शवली. आपल्या आवडीच्या नसलेल्या नोकऱ्यांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरू शकतो, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. एका युझरने लिहिलं, “ते फक्त आपल्या मनाचे ऐकत आहेत आणि पूर्ण समर्पणाने आपल्या आवडीचा पाठपुरावा करत आहेत. सर, खूप छान काम! तुम्ही गर्दीच्या मागे धावत नाही आहात, तर स्वतःचा मार्ग स्वतः तयार करत आहात.” दुसऱ्या एका युझरने म्हटले, “हा रील खूप आवडला. तुमच्या दोघांचाही आदर वाटतो. या कथेने मला माझी बाजूला पडलेली आवड पुन्हा जोपासण्याची प्रेरणा दिली. हा इतका प्रभावी संदेश शेअर केल्याबद्दल धन्यवाद.”