Tax Evasion Scam In India : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील प्राप्तिकर विभागाच्या तपासणीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासणीत हैदराबादमधील काही बिर्याणी रेस्टॉरंट्सने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांत फेरफार करत करचोरी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट्स आणि काही हॉटेल्समध्ये बिलिंग सॉफ्टवेअर वापरले जातात. मात्र, याच बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून तब्बल ७० हजार कोटींची करचोरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. या प्रकरणात आता प्राप्तिकर विभाग तपशील समोर आणत आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्राप्तिकर विभागाला करचोरीचा संशय आल्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये हैदराबादमधील काही रेस्टॉरंट्सवर छापे टाकत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा तपास करत असताना रेस्टॉरंट्स क्षेत्रात थेट देशव्यापी करचोरी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

२०१९-२० पासून ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल करत करचोरी करण्यात आल्याचं आयकर विभागाला आढळून आलं आहे. ही करचोरी एका बिलिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण कारवाई दरम्यान २०१९-२० ते २०२५-२६ या ६ आर्थिक वर्षांमधील सुमारे ६० टेराबाइट्स व्यवहार डेटाचं विश्लेषण केलं आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे सॉफ्टवेअर एक लाखाहून अधिक रेस्टॉरंट्स वापरतात आणि भारताच्या रेस्टॉरंट बाजारपेठेचा सुमारे १० टक्के वाटा आहे. दरम्यान, संबंधित सॉफ्टवेअरच्या सुविधेतून बॅकएंड अॅक्सेस मिळवल्यानंतर हैदराबादमधील आयकर भवन येथील विभागाच्या डिजिटल लॅबमध्ये फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. यावेळी तपासकर्त्यांनी एआय आणि काही एआय टूल्सचा वापर करून १.७७ लाख रेस्टॉरंट्स आयडीशी जोडलेल्या डेटाचं विश्लेषण केलं.

यावेळी अधिकाऱ्यांनी हायटेक फसवणुकीचा पर्दाफाश करत पैशांची उलाढाल दडपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक पद्धती ओळखल्या. यामध्ये असं आढळून आलं की काही रेस्टॉरंट्सनी अंतर्गत नियंत्रणासाठी कार्ड, यूपीआय आणि रोख पेमेंटसह सर्व व्यवहार बिलिंग सिस्टममध्ये प्रविष्ट केले. पण रिटर्न भरण्यापूर्वी रोख बिलांचे काही भाग निवडकपणे हटवले. म्हणजे सॉफ्टवेअरच्या बॅकएंडमधून नंतर काही विशिष्ट दिवसांचं संपूर्ण बिलिंग रेकॉर्ड डिलिट केलं जात होतं, त्यामुळे नोंदवलेलं उत्पन्न कमी दिसत होतं.

आतापर्यंत फक्त एकाच सॉफ्टवेअरची तपासणी

आयकर विभागाच्या हैदराबाद युनिटनुसार, आतापर्यंत फक्त एकाच बिलिंग सॉफ्टवेअरमधील डेटाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. जे बिलिंग सॉफ्टवेअर देशभरातली एक लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स वापरतात.