‘वर्किंग वुमन’ ही आजच्या काळातली अशी गोष्ट आहे जी आता रुढ झाली आहे. घरी आई-वडील आणि मुलगा मुलगी असं चौकोनी कुटुंब असो किंवा मुलगा अथवा मुलगी यापैकी एक असं त्रिकोणी कुटुंब असो आई-बाबा कामावर जातातच हे चित्र देशात घराघरांमधून दिसून येतं. अशाच काम करणाऱ्या एका महिलेने तिच्या मुलाच्या थेट पण तितक्याच निरागस प्रश्नावर भाष्य केलं आहे. या महिलेने व्हिडीओ पोस्ट केला आहे जो खरंचविचार करायला लावणार आहे. या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. लोक यावर चर्चा करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हैदराबाद या ठिकाणी काम करुन घर सांभाळणाऱ्या एका महिलेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. लावण्या वद्दनम असं या महिलेचं नाव आहे. लावण्या कायमच सोशल मीडियावर काम आणि कुटुंब यांचा समतोल कसा राखायचा याविषयीचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हटलं आहे या महिलेने?
लावण्या यांनी सांगितलं की माझा मुलगा शाळेत जाण्याआधी माझ्याकडे आला. त्याने मला सकाळी एक खास विनंती केली. मला म्हणाला की आई तू संध्याकाळी लवकर घरी ये. आपण दोघं मिळून एक ग्रिटिंग कार्ड तयार करु. कारण माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, मला त्याला हाताने तयार केलेलं ग्रिटिंग द्यायचं आहे. मी त्याला म्हटलं की होय आपण नक्की तयार करु ग्रिटिंग कार्ड. त्यानंतर माझा मुलगा शाळेत गेला आणि मी ऑफिसला पोहचले. पण मला ऑफिसमध्ये काम आलं आणि उशीर झाला. मी वेळेत घरी पोहचू शकले नाही. काम जास्त होतं त्यामुळे घरी पोहचायला उशीर झाला. मी काम संपवलं मुलाला माझ्या आई वडिलांकडून म्हणजेच त्याच्या आजीकडून घेऊन मी घरी आले तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मी मुलाला घरी घेऊन आले तेव्हा पाहिलं की तो उदास झाला आहे आणि शांत बसला आहे. मी त्याला घरी पोहचून विचारलं की बाळा तुला काय झालंय? तू शांत का ? त्यावर त्याने मला जो प्रश्न विचारला तो ऐकून मी पण चक्रावून गेले. मला त्याने विचारलं, “आई, तुला काय महत्त्वाचं आहे मी काही तुझं ऑफिस?” मी क्षणाचाही विलंब न करता त्याला सांगितलं की तूच महत्त्वाचा आहेस. काही प्रश्नच नाही. नोकरी महत्त्वाची नाही माझ्यासाठी तूच महत्त्वाचा आहेस. त्यावर तो म्हणाला की ठीक आहे, आणि तो तिथून निघून गेला. असा अनुभव या महिलेने तिच्या व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितला आहे.
त्याचा प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला होता, मग मी…
पुढे ही महिला म्हणाली मुलाचं असं निघून जाणं आणि त्याच्या मनात निर्माण झालेला प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला. माझा मुलगा झोपण्याच्या आधी मी त्याच्याजवळ गेले. मी पुन्हा विषय काढला. मी त्याला विचारलं की तुला असं का वाटतं की तू माझ्यासाठी महत्त्वाचा नाहीस? तसंच मुलालाही समजावून सांगितलं की का उशीर झाला. एवढंच नाही तर तू माझ्या आयुष्यात कशाही पेक्षा महत्त्वाचा आहेस हे पण त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ग्रिटिंग कार्ड तयार करु असंही त्याला सांगितलं. मुलगा हो म्हणाला, पण त्याच्याशी आणखी चर्चा करायला पाहिजे असं मला वाटलं. त्यानंतर मी त्याला माझं काम, माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या याबाबत समजावून सांगितलं. तसंच कामामुळे मला ऑफिसमध्ये उशीर झाला आणि मी तुला प्रॉमिस केलं असलं तरीही घरी वेळेत पोहचू शकले नाही हे त्याला सांगितलं. शिवाय अशा गोष्टी नोकरीच्या ठिकाणी घडल्या याचा अर्थ असा होत नाही की मला तुझ्यापेक्षा नोकरी महत्त्वाची वाटते हे मी त्याला सोप्या भाषेत त्याला कळेल अशा भाषेत समजावून सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
मी यातून शिकले की संयम आपणच वाढवला पाहिजे
या महिलेने पुढे म्हटलं आहे की मी ज्या समस्येला सामोरी गेले त्या समस्येला अनेक पालक सामोरे जात असतील. मी या अनुभवावरुन हे शिकले की मुलांना आपण पालक म्हणून, मित्र म्हणून आपल्याला येणाऱ्या समस्या, आपलं काम याबाबत सांगितलं पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसं केलं नाही तर मुलं त्यांचे आणि त्यांना पटणारे अर्थ काढून मोकळे होतात. असं झालं तर मग पालकांबाबत त्यांचे गैरसमज होऊ शकतात. आपण मुलांना समजून घेतो, तसं मुलांनीही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याला त्यासाठी स्वतःवर संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. मुलांवर न चिडता, संयमाने, शांततेने त्यांना सगळं समजावून सांगितलं पाहिजे, असं या महिलेने म्हटलं आहे. या व्हिडीओवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत?
लावण्या यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मुलांना आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स हे समजावून सांगितलं पाहिजे. त्यामुळे त्यांना भीती वाटणार नाही किंवा असुरक्षित वाटणार नाही. शिवाय ते त्यांचे त्यांचे असे काही समज तयार करणार नाहीत. अनेक युजर्स असंही म्हणाले आहेत की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यात मुलं तुम्हाला पाहात असतात, अनुकरण करत असतात. तुम्ही त्यांचे आदर्श असता. अशावेळी त्यांना समजून घेणं आणि त्यांना सगळं काही समजावून सांगणं हे दोन्ही आवश्यक असतं. तुम्ही जे केलंत ते योग्यच आहे असंही अनेक युजर्स लावण्या यांना म्हणाले आहेत.
