हैदरपोरा चकमकीची चौकशी दंडाधिकाऱ्यांमार्फत

चकमकीत ठार झालेल्या दोन नागरिकांच्या नातेवाईकांनी, श्रीनगरमधील प्रेस एन्क्लेव्हमध्ये धरणे धरले होते

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुरुवारी येथील हैदरपोरा चकमकीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. हैदरपोरा येथे सोमवारी झालेल्या चकमकीत ठार झालेले दोघे नागरिक हे दहशतवाद्यांचे सहकारी होते असा आरोप पोलिसांनी केला आहे.

‘हैदरपोरा चकमकीची  जिल्हा दंडाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वेळेत अहवाल सादर होताच सरकार योग्य ती कारवाई करेल. जम्मू आणि काश्मीर प्रशासन निरपराध नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असेल आणि त्यांच्यावर अन्याय केला जाणार नाही, असे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सोमवारी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या चारपैकी तीन जणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले. मोहम्मद अल्ताफ भट (इमारत मालक), मुदासीर गुल (एक भाडेकरू) आणि अमीर माग्रे (गुलचा कार्यालयीन सहकारी) यांच्या कुटुंबीयांनी या हत्येचा निषेध केला आहे, तसेच त्यांचे मृतदेह ताब्यात देण्याचीही मागणी नातेवाईकांनी केली आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या चौघांचे कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागात दफन करण्यात आले.

कुटुंबीयांना हटवले

चकमकीत ठार झालेल्या दोन नागरिकांच्या नातेवाईकांनी, श्रीनगरमधील प्रेस एन्क्लेव्हमध्ये धरणे धरले होते, त्यांना पोलिसांनी मध्यरात्री बळजबरीने हटवले तर काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलक बुधवारी सकाळपासूनच ठिय्या मांडून होते. राज्यातील अनेक नेत्यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला.

‘निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात देण्याऐवजी, पोलिसांनी नातेवाईकांनाच त्याबद्दल अटक केली आहे. ही कृती निर्दयी आणि असंवेदनशील आहे’, असे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.  नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ही कारवाई संतापजनक असल्याचे म्हटले आहे.

हुरियतची बंदची हाक 

हैदरपोरा चकमकीत मारल्या गेलेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ तसेच पीडितांना न्याय मिळावा आणि त्यांचे मृतदेह परत मिळावेत या मागणीसाठी हुरियत कॉन्फरन्सने शुक्रवारी बंद पुकारला आहे. हैदरपोरा चकमकीने काश्मीरमधील लोक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक नेते आणि राजकीय कार्यकर्ते तुरुंगात किंवा नजरकैदेत असल्याने, अशा चकमकीचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळावा’, असे आवाहन हुरियत कॉन्फरन्सने एका निवेदनाद्वारे केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hyderpora encounter lg orders magisterial probe zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य