दुबई : हायपरलूप ही सार्वजनिक प्रवासी व मालवाहतूक व्यवस्था संयुक्त अरब अमिरातींआधी भारत किंवा सौदी अरेबियात सुरू होईल, असे डीपी वर्ल्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांनी रविवारी सांगितले.

दुबई एक्स्पो २०२० च्या सहा महिन्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन १ ऑक्टोबरला झाले. त्या वेळी सुलायेम यांनी सांगितले, की उच्च गती वाहतूक व्यवस्था दशकाअखेरीस जगाच्या अनेक भागांत प्रत्यक्षात येईल. व्हर्जिन हायपरलूप सेवा केव्हा उपलब्ध होईल, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की ही सेवा भारतात किंवा सौदी अरेबियात सर्वप्रथम उपलब्ध होईल. जेव्हा अर्थव्यवस्था वाढत असते आणि प्रवासी व मालवाहतुकीसाठी मोठी अंतरे पार करावी लागतात, तेव्हा हायपरलूपची एअरप्लेन सेवा ट्रक व इतर वाहतूक साधनांपेक्षा स्वस्त पडते. एअरप्लेन सेवा व्हर्जिन हायपरलूप कंपनी तयार करीत असून त्यात डीपी वर्ल्डचा मोठा वाटा आहे.

 हायपरलूप ही एक बंदिस्त वाहिनीसारखी रचना असते. ती हवेचा फारसा विरोध न होता एका ठिकाणाहून दुसरीकडे फार वेगाने जाते. गेल्या वर्षी हायपर लूप पॉडची मानवी प्रवास चाचणी यशस्वी झाली होती. काही दशके नव्हे, तर काही वर्षांत ही सेवा सगळीकडे दिसेल, असे सुलायेम यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

डीपी वर्ल्डने म्हटले आहे, की हायपरलूप मालवाहतूक सेवेत काही बदल करून किंमत व जागा यात २५ टक्के बचत करता येईल. 

पुणे- नवी मुंबई प्रस्ताव

फेब्रुवारी २०१८ मध्ये व्हर्जिन हायपरलूप वनचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी असे जाहीर केले होते, की हायपर लूप सेवा महाराष्ट्रात पुणे व नवी मुंबई दरम्यान सुरू करता येईल. पण करोना प्रसारामुळे या योजनेवर पुढे काहीच प्रगती झाली नाही.