“मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”; कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना सोनिया गांधींचे उत्तर

माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

I am a full time and hands on Congress president says Sonia Gandhi at CWC meeting
(फोटो सौजन्य – @INCIndia ट्विटर)

विविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता, सोनिया गांधी यांनी त्या काँग्रेसची स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे.  काँग्रेस अध्यक्ष आणि संघटनेच्या निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत सोनिया गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे असे म्हटले.

‘जी -२३’ नेत्यांच्या समोरच सोनिया गांधी यांनी मी पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष आहे असे म्हटले. “मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षांच्या निवडीबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. “आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

आगामी विधानसभा निवडणुकांविषयी बोलताना काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी म्हणाल्या, “आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू.” उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची माहितीही सोनिया गांधी यांनी दिली.

यावेळी सोनिया गांधी यांनी लखीमपूर खेरीच्या घटनेवरही भाष्य केले. अलीकडे लखीमपूर-खेरीसारख्या धक्कादायक घटना भाजपाची मानसिकता दर्शवतात. यातून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसे पाहत आहेत ते स्पष्ट दिसते. यातून स्पष्ट दिसते की भाजपा शेतकऱ्यांच्या जीवनाच्या आणि त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी या स्थिर संघर्षाला कसे सामोरे जात आहे.”

दरम्यान, काँग्रेसच्या ‘जी २३’ गटाच्या नेत्यांकडून पक्षात चर्चेसाठी मागण्या आणि अलिकडच्या काही महिन्यांत अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. अलीकडेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी सीडब्ल्यूसीची बैठक घेण्याची मागणी केली होती. आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तात्काळ बैठक घेण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या पंजाब युनिटमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान सिब्बल यांनी अलिकडच्या काळात पक्ष नेतृत्वावर प्रश्नही उपस्थित केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am a full time and hands on congress president says sonia gandhi at cwc meeting abn