PM Narendra Modi : गेल्या चार आठवड्यांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका भारतासह आणखी काही देशांना बसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहांजारवर हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

पण अशा परिस्थितीतही आखाती देशांनी भारताला केलेल्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासह आदी मदतीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३२ व्या भागात आखाती देशांचे आभार मानले आहेत. तसेच पश्चिम आशियातील सद्याच्या परिस्थितीबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांत राहणाऱ्या जवळपास १ कोटी भारतीयांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी आखाती देशांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच आखाती देशातील तणावाच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, “पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे महिन्याभरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा अनेक देशांवर परिणाम देखील झाला. मात्र, अशा परिस्थितीत देखील या देशांनी संकटाच्या काळात भारतीय नागरिकांना सर्व आवश्यक मदत आणि सुविधा पुरवल्या आहेत. सध्या गेल्या जवळपास एका महिन्यापासून तीव्र संघर्ष सुरू आहे. तेथे राहणाऱ्या १ कोटी भारतीयांना सर्व आवश्यक पाठिंबा आणि सुविधा पुरवल्याबद्दल मी आखाती देशांचा अत्यंत आभारी आहे”,असंही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी भारतीयांना काय आवाहन केलं?

पंतप्रधान मोदींनी जनतेला या संकटाच्या काळात एकजूट राहण्याचं आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. देशाचं नुकसान करू शकणाऱ्या अफवा आणि राजकीय विधानांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मोदी म्हणाले की, “जे अफवा पसरवत आहेत ते देशाचं मोठं नुकसान करत आहेत. लोकांनी केवळ सरकारकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच या आव्हानावर आपण एकजुटीने मात करू”, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.