scorecardresearch

मी हिंदुत्त्ववादी नाही तर राष्ट्रीय नेता आहे-राहुल गांधी

राहुल गांधी हिंदू फॅन्सी ड्रेस स्पर्धा खेळत असल्याची टीका भाजपाने केली होती त्यावर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

मी हिंदुत्त्ववादी नाही तर राष्ट्रीय नेता आहे-राहुल गांधी
राहुल गांधी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या मध्यप्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंदिरांच्या वाऱ्या करताना दिसत आहेत असा आरोप भाजपाकडून होतो आहे. त्यांच्या या मंदिर दौऱ्यांवर भाजपाकडून सातत्याने टीका होताना दिसते आहे. या सगळ्या टीकेला आता राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. मी हिंदुत्त्ववादी नेता नाही पण राष्ट्रीय नेता आहे. माझ्यासाठी सगळे धर्म सारखेच आहेत. प्रत्येक जातीच्या, धर्माच्या आणि समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाच्या लोकांबाबत माझ्या मनात आदर आहे. मला हिंदू धर्म काय असतो ते भाजपाने शिकवण्याची गरज नाही.

राहुल गांधी यांच्या मंदिर दौऱ्यांवर टीका करताना राहुल गांधी यांना त्यांचे गोत्र विचारले तर सांगता येईल का असा प्रश्न भाजपाने विचारला होता. तसेच राहुल गांधी मंदिरांचे दौरे करून हिंदूत्त्ववादी नेता असल्याची फॅन्सी ड्रेस स्पर्धाच दाखवत आहेत असेही वक्तव्य भाजपातील नेत्यांनी केले होते. या सगळ्या टीकेचा समाचार घेत राहुल गांधी यांनी भाजपाला उत्तर दिले आहे. मी हिंदुत्त्ववादी नेता नाही तर राष्ट्रीय नेता आहे असे त्यांनी म्हटले आहे.

एवढंच नाही तर देशातली मंदिरे ही काही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मालकीची आहेत का? या मंदिरांमध्ये जाण्याचा तिथे जाऊन पूजा करण्याचा अधिकार फक्त मोदी आणि शाह या दोघांनाच आहे का? तर असे मुळीच नाही देशातल्या प्रत्येकाला मंदिरात जाण्याचा अधिकार आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूजा करण्यासाठी जेव्हा मंदिरांमध्ये जातात तेव्हा तेदेखील तिथल्या परंपरांप्रमाणेच वस्त्रं परिधान करतात मग ते फॅन्सी ड्रेस करत आहेत असा आरोप तर कोणीही करत नाही. अशात मी, कमलनाथ आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांनी जर मंदिरात जाताना जी वस्त्रं आहेत ती धारण केली तर त्यात चुकीचे किंवा  गैर काय आहे? असाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला.

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या