पाकिस्तानात वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव ऐनवेळी संसदेच्या उपसभापतींनी घटनाबाह्य ठरवून फेटाळला. त्यानंतर इम्रान यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्षांनी पाकिस्तानी संसद बरखास्त केली. त्यामुळे तेथे आता ९० दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. असं असतानाच आता पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारत आणि अमेरिकेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे लावून बसणं म्हणजे…
इम्रान खान यांनी सोमवारी आपण भारतविरोधी आणि अमेरिकाविरोधी नसल्याचं म्हटलं आहे. एकमेकांचा सन्मान करणारं नातं आपल्याला इतर देशांसोबत जोडायचं आहे असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या गोंधळानंतर सोमवारी देशातील नागरिकांना संबोधित करताना इम्रान यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. संसद बरखास्त केल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसण्याची संयुक्त विरोधकांची रणनीती हे “जनमताची भीती असल्याचं लक्षण आहे, असा टोला इम्रान यांनी विरोधाकांना लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील राजकीय परिस्थितीची स्वत:हून दखल घेतली असून, अध्यक्ष आणि संसदेच्या उपसभापतींना नोटिसा बजावल्या आहेत.

नेमकं घडलं काय?
३४२ सदस्यांच्या संसदेत पंतप्रधान इम्रान यांनी बहुमत जवळजवळ गमावले आहे. हे लक्षात आल्याने त्यांनी राष्ट्राला उद्देशून एक संक्षिप्त संदेश प्रसारित केला. त्यात त्यांनी संसद विसर्जित करण्याची आणि निवडणुका घेण्याची शिफारस केली. अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याबद्दलही त्यांनी रविवारी देशाचे अभिनंदन केले. ‘‘उपसभापती सुरी यांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न आणि परकीय षडम्यंत्र उद्ध्वस्त केले आहे. देशाने आता निवडणुकांसाठी सज्ज राहायला हवे. आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव हा प्रत्यक्षात परकीय डाव होता,’’ असं इम्रान म्हणाले. आपण अध्यक्ष अल्वी यांना संसद विसर्जित करण्याचा सल्ला दिल्याचेही इम्रान म्हणाले. त्यानंतर इम्रान यांच्या सल्ल्यानुसार संसद बरखास्त करण्यात आल्याचे अध्यक्ष अल्वी यांच्या कार्यालयाने जाहीर केले.

भारतविरोधी नाही पण…
इम्रान यांनी दुसऱ्या देशातून आलेल्या लेटर बॉम्बचाही उल्लेख केला. त्याचसंदर्भात आता इम्रान यांनी स्पष्टीकरण देताना इतर देशांसोबत आपल्याला चांगले हितसंबंध जपायचे आहे असं म्हटलंय. “मी कोणत्याही देशाविरोधात नाहीय. मी भारतविरोधी किंवा अमेरिकाविरोधी नाहीय. पण आपण धोरणांच्याविरोधात असू शकतो. आपल्याला एकमेकांचा सन्मान करणारं नातं इतर राष्ट्रांसोबत हवंय,” असं इम्रान यांनी स्पष्ट केल्याचं डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

आपण कोणाविरोधातही नाही…
इम्रान खान यांनी अमेरिकेविरोधात आपण नसून परराष्ट्रांनी पाकिस्तानाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करु नये असं आपल्याला वाटतं. अमेरिकेसोबत आपल्याला चांगले संबंध निर्माण करायचे आहेत असं इम्रान यांनी म्हटल्याचं इक्सप्रेस ट्रेब्युलनच्या वृत्तात म्हटलंय. पाकिस्तानच्या सर्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या देशांच्य आपण विरोधात आहोत असं इम्रान यांनी स्पष्ट केलं असून विरोधी पक्ष याच देशांचा आधार घेतात असा आरोपही त्यांनी केलाय.

भारताचं कौतुक…
मागील काही दिवसांपासून इम्रान खान हे भारताबद्दल चांगलं बोलत असल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी त्यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपलं स्वतंत्र्य परराष्ट्र धोरण जपल्याबद्दल भारताचं कौतुक केलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप
संसद बरखास्तीबाबतचे पंतप्रधान, अध्यक्षांचे सर्व आदेश आणि कृती आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाच्या अधीन असतील, असे पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी रविवारी स्पष्ट केले. देशातील कोणत्याही संस्थेने घटनाबाह्य पाऊल उचलू नये, असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला़  या प्रकरणाची सुनावणी आता एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या कठोर भूमिकेमुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े

लष्कराची अलिप्ततेची भूमिका
पाकिस्तानात घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, असे पाकिस्तानी लष्कराने स्पष्ट केले. लष्कराच्या जनसंपर्क शाखेचे प्रमुख मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘‘राजकीय प्रक्रियेशी लष्कराचा काहीही संबंध नाही’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.